• शिक्षण विभागात 123 जणांना पदोन्नती
परभणी, दि.09 : आजचे विद्यार्थी हे भविष्यातील देशाचे प्रमुख आधारस्तंभ असून, ते उद्याचे भावी नागरिक आहेत. हे नागरिक सुसंस्कृत, उच्चशिक्षित आणि भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून घडावेत. यासाठी शिक्षण विभागातील पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माथूर यांनी प्रलंबित असलेली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील पदोन्नतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे आणि समुपदेशनाने पूर्ण करत 123 जणांना पदस्थापना दिली. त्यावेळी त्या पदोन्नत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) ओमप्रकाश यादव, शिक्षणाधिकारी संजय ससाने उपसि्थत होते.
जिल्हा परिषदेच्या विविध 123 पदांची ही पदोन्नती प्रक्रिया 8 जानेवारी 2025 रोजी पार पडली. यामध्ये अराजपत्रिक मुख्याध्यापक -2, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी – 4, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी – 10, केंद्र प्रमुख -29, उच्चश्रेणी मुख्याध्यापक (मराठी) – 66 आणि उच्चश्रेणी मुख्याध्यापक (उर्दू) -12 अशा एकूण 123 जणांना पदोन्नती देण्यात आली.
पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, उपमुख्यी कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, शिक्षणाधिकारी सुनील पोलास, संजय ससाने यांनी पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांना विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले.