मराठवाड्यात ईडीने 1433 कोटींची संपत्ती घेतली ताब्यात

0
50

छत्रपती संभाजीनगर,दि.११ः- आजकाल अधिक व्याजदराचे आमिष दाखवत फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच मराठवाड्यात लाखो ठेवीदारांना अधिक चांगले व्याजदराचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ED ने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे आता ज्ञानराधा मल्टीस्टेटचा घोटाळा उघडकीस आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मराठवाड्यात असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. याप्रकरणी ईडीने यापूर्वीच ज्ञानराधा मल्टीस्टेटवर कारवाई केली होती. अशातच आता ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यावेळी जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत तब्बल 1433 कोटी 48 लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे आणि त्याच्या पत्नी अर्चना कुटे यांनी मल्टीस्टेटच्या माध्यमातून 4 लाखांहून अधिक ठेवीदारांकडून 2470 कोटी रुपये गोळा केले होते. तसेच या सर्व ठेवीदारांना तब्बल 12 ते 14% व्याजदराचा परतावा देण्याचे आश्वासन यांनी दिले होते. मात्र, या ठेवींचा त्यांनी अपहार करत कुटे ग्रुपच्या सर्व कंपन्यांना फसव्या कर्जांच्या स्वरूपात रक्कम वाटप करण्यात आली होती.

दरम्यान, सुरेश कुटे ग्रुपने या रकमेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला असून अनेक बँक खात्यांतून थेट पैसे काढून घेतल्याचं ईडी चौकशीत समोर आलं आहे. तसेच याप्रकरणी सुरेश कुटे आणि कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून MPID या कायद्यांतर्गत मे ते जुलै 2024 दरम्यान राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

मात्र, आता ठेवीदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलेल्या या घोटाळा प्रकरणामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. तसेच फसवणूक झालेल्या ठेवीदारांना न्याय मिळावा, यासाठी ईडी या घोटाळ्याचा सखोल तपास करत आहे.