धाराशिव दि.२३ – जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीमती अंशू सिन्हा यांनी आज २३ जानेवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कोरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अन्सारी तसेच प्रा आ केंद्र सावरगावं येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
श्रीमती सिन्हा यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवाची पाहणी केली.यावेळी त्यांनी बाह्यरुग्ण विभाग,आंतर रुग्ण विभाग,प्रसुती गृह, शस्त्रक्रियागृह,प्रयोगशाळा विभाग,नेत्ररोग विभाग,असंसर्गजन्य रोग विभाग, लसकिरण विभाग,औषधी भांडार, अभिलेखा कक्ष इत्यादीची पाहणी केली.
शंभर दिवसाच्या ७ कलमी कृती कार्यक्रमाअंतर्गत सर्व विभाग प्रमुखांनी क्षेत्रीय भेटी द्याव्यात व कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
सर्व रुग्णांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात याव्यात,याबाबत सूचना करून मार्गदर्शन केले.प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णास देण्यात येत असलेल्या सेवाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.काही सुधारणा करण्याबाबतही सुचना केल्या.
पालक सचिवांच्या भेटीप्रसंगी जिल्हा आयुष अधिकारी डॉ.गजानन परळीकर, आयुष जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विकास पवार तसेच आयुष वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.