लातूर, दि.26 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी २०२५ हा पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये केलेल्या कामगिरीची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार घोषित झाला.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एम.आय.टी. विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, एम.आय.टी. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांना शुभेच्छा देवून डॉ. कुलकर्णी म्हणाले, यावर्षीपासून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यातील विविध भागात राज्यपातळीवरील कार्यक्रम आयेाजित करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने घेतला आहे; त्याची सुरुवात पुणे येथून करण्यात आली आहे. समाजातील मतभेद चर्चेतून सोडविण्याकरीता, लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्याकरीता मतदार दिवस साजरा करण्यात येतो. मतदान हे पवित्र कार्य असून मतदारांनी त्याचा व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे.
लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतपत्रिकांची देवाण-घेवाण करण्याचे नियोजन, मतदान साहित्य वाटप करून घेण्याचे नियोजन, मतदार सुविधा, वार्तांकन पुरस्कार आणि शासकीय भागीदारी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
हा सन्मान निवडणूक यशस्वी करण्यामध्ये सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत लातूर जिल्हा प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. लातूर जिल्हावासिय, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचीही भूमिका या प्रक्रियेत महत्त्वाची आणि सहकार्याची राहिली. राज्यस्तरीय पुरस्कार हा सन्मान माझ्या एकटीचा नसून निवडणूक यशस्वी करण्यामध्ये सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या.