अहमदपूर –राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत अहमदपूर तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. तालुका पशुचिकित्सालय इमारत आणि रस्ते विकास कामांचा यामध्ये समावेश होता.
आमदार विक्रम काळे, आमदार संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश क्षीरसागर, कार्यकारी अभियंता अलका ढोके, उपअभियंता जी. बी. भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री ना. भोसले आणि सहकार मंत्री ना. पाटील यांच्या हस्ते अहमदपूर तालुक्यातील हसर्णी सावरगाव थोट शेलदरा केकत सिंदगी ते जिल्हा सरहद्द रस्ता (प्रमुख जिल्हा मार्ग-२५) रुंदीकरण आणि हसर्णी गावात सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम या कामाचे भूमिपूजन झाले. या कामासाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच अहमदपूर तालुक्यातील प्रमुख जिल्हामार्ग-२० ते धानोरा-सताळा-महाळंगी-जानवळ-शिवणखेड-मुगाव रस्ता (प्रमुख जिल्हा मार्ग-१७), धानोरा गावातील सिमेंट रस्ता आणि रुंदीकरण कामाचे भूमिपूजन यावेळी झाले. या कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
अहमदपूर येथील तालुका पशुचिकित्सालय इमारत बांधकामाचे पालकमंत्री ना. भोसले आणि सहकार मंत्री ना. पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या इमारतीच्या कामासाठी २ कोटी ४९ लक्ष रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना विविध विकास कामांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले. तसेच विविध योजनांची अंमलबजावणी करून गरीब, गरजूंना मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अथवा इतर कोणतीही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
अहमदपूर व चाकूर तालुक्यातील विकास कामांना गती देण्यात येईल. या भागात सिंचन सुविधा निर्मितीसाठी अंतेश्वर उपसा सिंचन योजनेकरिता आवश्यक कार्यवाही सुरू आहे. याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सकारात्मक असून त्यांनी याअनुषंगाने संबंधितांना सूचना दिल्या आहेत. यासोबतच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार विभागाच्या माध्यमातून सहकार्य केले जाणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.