प्रत्येक रविवारी सायकलवर मोहिमेला उत्स्फूर्त सहभाग

0
28
धाराशिव,दि.२ मार्च – नागरिकांच्या तंदुरुस्तीसाठी केंद्र शासनाच्या “फिट इंडिया” मोहिमेअंतर्गत ” प्रत्येक रविवारी सायकलवर ” (“Every Sunday on Cycle”) हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाची दखल पंतप्रधानांनी “मन की बात” कार्यक्रमात घेतली असून,देशभरात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ” प्रत्येक रविवारी सायकलवर ” या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रॅली आज २ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू झाली.कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, भारतीय खो-खो असोसिएशनचे सचिव व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी डॉ.चंद्रजीत जाधव तसेच खो-खो विश्वचषक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती अश्विनी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.विलास जाधव आणि डॉ.जाधव यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
रॅलीमध्ये अधिकारी-कर्मचारी, फ्युचर सायकलींग ग्रुप,खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र,जिल्हा प्रशिक्षण केंद्र तसेच विविध शाळा-महाविद्यालयांचे खेळाडू व नागरिक असे एकूण १५० सायकलस्वार सहभागी झाले. “फिटनेस का डोस,आधा घंटा रोज” अशा घोषणा देत नागरिकांमध्ये आरोग्य व तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
धाराशिव शहरातील प्रमुख मार्गावरुन ही रॅली काढण्यात आली आणि श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे तिचा समारोप झाला.या रॅलीचे यशस्वी आयोजन भैरवनाथ नाईकवाडे,अक्षय बिरादार,डॉ. शुभांगी रोकडे,जान्हवी पेठे,सुरेश कळमकर आदींनी केले.
तंदुरुस्त भारतासाठी अशा मोहिमा महत्त्वपूर्ण असून,नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.