लातूरची गौरवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे : जिल्हाधिकारी

0
28
सण, जयंती उत्सव शांततेत साजरी करण्याची लातूरची परंपरा जपण्याचा निर्धार !
लातूर, दि.30 : आपला जिल्हा हा शांतताप्रिय असून यामुळे राज्यात जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आजपर्यंत सर्वधर्मीय सण, जयंती उत्सव शांततेत साजरे करण्याची गौरवशाली परंपरा आपण यापुढेही जपूया. सण, उत्सव साजरे करताना सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपस्थित पदाधिकारी, सर्वधर्मीय प्रतिनिधी यांनी सण, जयंती उत्सव शांततेत साजरे करून लातूरची परंपरा जपण्याचा निर्धार केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सर्वधर्मीय प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी, प्रतिनिधी यांनी सण, जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध सूचना मांडल्या. श्रीराम नवमी, रमजान ईद, भगवान महावीर जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि महात्मा बसवेश्वर जयंतीच्यानिमित्ताने या शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्येक धर्म, महापुरुष यांनी मानवतेचा संदेश दिला आहे. त्यांचे विचार आत्मसात करून सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सर्वांनी एकमेकांच्या धर्माचा, सणाचा सन्मान करावा. प्रत्येक जयंती, सण उत्साहात आणि आनंदात साजरा करताना आपल्यामुळे इतरांना त्रास होवू नये, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. कायदा व सुव्यवस्था, शहरातील मिरवणूक मार्गावरील सुविधाबाबत जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही केली जाईल. सर्वधर्मीय नागरिक, विविध जयंती समितीचे पदाधिकारी यांनी नियमांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.
डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा निर्णय कौतुकास्पद
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक यावर्षी डॉल्बीमुक्त वातावरणात काढण्याचा निर्णय आनंदनगर येथील जयंती समितीने घेतला आहे. या समितीचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. मिरवणुकीत येणाऱ्या महिला, मुले आणि वृद्ध नागरिकांना डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने त्रास होण्याची शक्यता असते. त्यांनाही या मिरवणुकीत सहभागी होवून आपला आनंद साजरा करता यावा, यासाठी सर्व जयंती समितींनी डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा संकल्प करावा, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
डॉल्बीमुक्त जयंतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे- जिल्हा पोलीस अधीक्षक
लातूरमध्ये जयंतीसमितीच्या पदाधिकाऱ्यांकडूनच डॉल्बीमुक्तीची मागणी करण्यात आली आहे, हे लातूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सर्व सण, उत्सव हे डीजेमुक्त आणि डॉल्बीमुक्त वातावरणात साजरे व्हावेत, अशी पोलीस प्रशासनाची भूमिका आहे. यासाठी सर्व पोलीस स्टेशन स्तरावर संबंधितांची बैठक घेवून आवश्यक कार्यवाही केली जाईल. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करून आपले सण, उत्सव साजरे करावेत. शांतताप्रिय लातूरच्या गौरवशाली परंपरेला कोणतेही गालबोट लागणार नाही, यासाठी सर्वजण खबरदारी घेवूया, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यावेळी म्हणाले.
लातूर शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजविणे, विद्युत दिव्यांची दुरुस्ती आणि या मार्गावरील मिरवणुकीला अडथळा करणाऱ्या विद्युत वाहिन्या, झाडांच्या लोंबकळनाऱ्या फांद्या काढण्याची कार्यवाही लातूर शहर महानगरपालिकेमार्फत केली जाणार आहे. तसेच सण, जयंती उत्सव कालावधीत गर्दी होणाऱ्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व फिरते स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले.लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.