**स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न
परभणी, दि. १५ : शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्यांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून परभणी जिल्हा विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहे. शेती, उद्योग, रोजगार, आरोग्य, जलसंधारण आणि पायाभूत सुविधांना गती देऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शुभेच्छा संदेश देताना त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, आमदार राहूल पाटील, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आदींसह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानातील सहभागाबद्दल परभणीकरांचे अभिनंदन केले. तर विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाने राज्यात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले. पोलीस विभाग राबवित असलेल्या लोकाभिमुख उपक्रमाबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक व सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांही अभिनंदन केले.
यावेळी जलसंधारण सप्ताह निमित्त आयोजित “महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर” लोगोचे अनावरण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. समाजकल्याण विभागामार्फत आयोजित गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तसेच जलसंधारण सप्ताह निमित्त आयोजित जनजागृती रथास पालकमंत्री यांनी हिरवी झेंडी दाखविली.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर आपल्या शुभेच्छा संदेशात, म्हणाल्या की, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेत जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ७६९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या यादीतील पात्र ७९ हजार ८५५ शेतकऱ्यांसाठी ५८२ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर राज्यस्तरावर नुकत्याच जाहीर झालेल्या पहिल्या यादीत जिल्हयातील ७ हजार ८७० शेतकऱ्यांच्या खात्यात ६० कोटी ४ लाख रुपये जमा झाले आहेत. ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’तून ९९ हजार ३५८ कृषीपंपधारकांना लाभ मिळाला असून, ६२२ कोटी ९० लाख रुपयांचे वीज बिल माफ झाले आहे. पीक विमा योजनेत ५ लाख २३ हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले असून, ३ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले आहे.
उद्योग आणि रोजगाराला चालना देण्यासाठी ‘परभणी ग्रोथ हब’अंतर्गत रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी परभणीत आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणुक परिषदेच्या माध्यमातून जिल्हयात उद्योग वाढीसाठी सुमारे १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. जिल्हयात ‘सिल्क अँड मिल्क’ मॉडेलच्या माध्यमातून रेशीम शेती व दुग्ध व्यवसायाला चालना देण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्यांमधून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या जात असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून २ हजार ४३५ लाभार्थ्यांना ३९२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
महिला सक्षमीकरणालाही प्राधान्य देण्यात येत असून, शेतीपूरक व्यवसायातील महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात एक लाखांहून अधिक महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत.
जलसंधारणासाठी लोकसहभागाचे आवाहन करत १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. २१ ऑगस्टच्या ‘महा वॉकेथॉन—वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
आरोग्य आणि लोकाभिमुख प्रशासनातही जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. जिल्हा रुग्णालयाने सलग दोन वेळा राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, कॅथलॅबचे काम पूर्ण झाले आहे आणि एमआरआय सुविधेचा सुमारे एक हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून ३० हजारांहून अधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळाला आहे.. ८५२ ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल गाव नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले असून, सौरऊर्जा, क्रीडा, घरकुल, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांनाही गती देण्यात येत आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून आरोग्य, शिक्षण, शेती व जलसंपदा क्षेत्रातही विकासाला चालना मिळणार आहे.
जनतेच्या सहभागातून विकसित, सक्षम आणि समृद्ध परभणी घडविण्यासाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवू, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थितांना नशामुक्त भारत अभियानातंर्गत नशामुक्ती आणि जलसंधारण सप्ताहनिमित्त जलसंवर्धनाची शपथ दिली. यांनतर पालकमंत्री यांनी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, उपस्थित नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमानंतर जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते विविध विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच विशेष परिक्षांमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. वीर पत्नी / वीर माता / पिता यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण वायकोस यांनी केले.





