24.9 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home मराठवाडा/खान्देश ‘माझे गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला बळ ; केशेगाव येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य...

‘माझे गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला बळ ; केशेगाव येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा

0
15
धाराशिव,दि.२४ ऑगस्ट– राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘कस काय मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र,केशेगाव येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दि. १९ व २० ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.गावातील प्रत्येक नागरिकाला गावातच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक,सुलभ व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे,आजारांचे प्रतिबंध व लवकर निदान यावर भर देणे तसेच समुदायाचा आरोग्य व्यवस्थापनातील सक्रिय सहभाग वाढविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, बेंबळी, येथे ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा’ (CPHC) प्रशिक्षणाचा शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांच्या हस्ते दि.७ जून २०२६ रोजी करण्यात आला. पर्यावरणपूरक संदेश देत कार्यक्रमस्थळी वृक्षारोपण करून या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.आजपर्यंत जिल्ह्यात सात सत्रे पूर्ण झाली असून,केशेगाव येथे आठवे सत्र संपन्न झाले. दि. २४ व २५ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र,ढोकी येथे नवव्या सत्राचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ईस्माईल मुल्ला,बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीधर जाधव,डॉ.प्रशांत रेवडकर, डॉ.विकांत राठोड तसेच सुहास शिंदे,आरोग्य सहाय्यक निलंकठ मोरे,संजय शिंदे,श्रीमती सुवर्णा सुरवसे व मंजुश्री सुरवसे हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.
प्रशिक्षणात समग्र व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC), माता व बाल आरोग्य सेवा, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्य शिक्षण,समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन,लवकर निदान,उपचार व आवश्यक संदर्भ सेवा,गावपातळीवरील आरोग्य उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी तसेच ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या आरोग्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रतिबंधात्मक,प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक व पुनर्वसनात्मक आरोग्य सेवांना बळकटी देण्यात येत आहे.