29.2 C
Gondiā
Monday, September 7, 2026
Home मराठवाडा/खान्देश शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले जिल्हाधिकारी; जाणून घेतल्या व्यथा

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले जिल्हाधिकारी; जाणून घेतल्या व्यथा

0
7
पावसाच्या मोठ्या खंडाने पीक परिस्थिती गंभीर ; शिवारात प्रत्यक्ष पाहणी, शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद
धाराशिव,दि.7 सप्टेंबर- पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे यंदा जिल्ह्यातील पीक परिस्थिती गंभीर बनली आहे.डोळ्यांसमोर पिके संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावाला भेट दिली.तर निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी आज इंदापूर कडकनाथवाडी, बोरी,पळसप येथील शेतीची पाहणी केली केली.
यांच्या भेटीदरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांसमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.पेरणीनंतर आशेने वाढविलेली पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री पुजार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.महाडदळकर यांनी काक्रंबा शिवारातील शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसाच्या खंडामुळे पिकांवर झालेला परिणाम,सध्याची पीकस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी शेतकरी,कृषी सहायक,तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते.
पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.या समित्यांकडूनही शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे.या कामात आयआयटी मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी येथील प्रतिनिधींचीही मदत घेतली जात आहे.तज्ज्ञांच्या सहभागातून पीक परिस्थितीचा अभ्यास होत असल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे.
पीक नुकसानीची योग्य नोंद होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी प्रक्रियेत आवर्जून सहभागी व्हावे,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची अचूक नोंद केल्यास पीक नुकसानीपोटी शासनाकडून मदत देण्याच्या प्रक्रियेत त्याचा उपयोग होणार आहे.