टाटांचा हवाई ‘विस्तार’ भारताबाहेरही

0
11

(साभार पीटीआय)
नवी दिल्ली-विदेशी हवाई सफरीसाठीची अनिवार्यता सरकार लवकरच दूर सारेल, असा विश्वास व्यक्त करत भारतात विमान प्रवासासाठी पंख पसरण्यास उत्सुक असलेल्या टाटा समुहातील नव्या विस्तार कंपनीने आता साता समुद्रापल्याड झेप घेण्याचे मनोबल उंचावले आहे. पाच वर्षांच्या आतच २० पेक्षाही कमी विमानांच्या जोरावर कंपनीने आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे स्वप्न रंगविले आहे. यासाठी कंपनी विदेशातील भागीदारांबरोबर चर्चाही सुरू करत आहे.
विदेशातील हवाई प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी कोणत्याही कंपनीला स्थानिक पातळीवरील पाच वर्षांचा अनुभव व ताफ्यात २० विमानांची क्षमता आवश्यक आहे.
टाटा समूह व सिंगापूर एअरलाईन्स यांची भागीदारी असलेल्या विस्तारची भारतातील हवाई सेवा अद्याप सुरू होणे आहे. टाटा समुहाची मलेशियाच्या एअर एशियाबरोबरची देशांतर्गत हवाई सेवा निवडक शहरांमध्ये याच वर्षांच्या मध्यानंतर सुरू झाली आहे.
असे असले तरी विदेशात हवाई सफर घडवून आणण्यासाठीची विमान क्षमता व उड्डाण अनुभव शिथिल होईल, असा आशावाद नव्या विस्तार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फी टेक यूह यांनी सोमवारी नवी दिल्लीत व्यक्त केला.
राजधानीत मुख्यालय असलेल्या विस्तारच्या भारतातील हवाई सेवेला येत्या ९ जानेवारी रोजी प्रारंभ होत आहे. दिल्ली-मुंबई, दिल्ली-अहमदाबाद व अहमदाबाद-मुंबई सेवा सुरू करणाऱ्या विस्तारला गेल्याच आठवडय़ात हवाई चलत परवाना मिळाला.
कंपनीत तूर्त टाटा समुहाचा सर्वाधिक ५१ तर सिंगापूर एअरलाईन्सचा उर्वरित ४९ टक्के हिस्सा आहे.कंपनीच्या ताफ्यात एअरबस कंपनीची ए३२० जातीची विमाने असतील. पहिल्या वर्षांत ८७ विमाने चालविण्याचा कंपनीचा इरादा आहे.

स्पाईसजेटची देणी रक्कम विस्तारली
eco02बिकट आर्थिक स्थितीपोटी अनेक उड्डाणे रद्द करावे लागणाऱ्या स्पाईसजेटकडे विविध गुंतवणूकदार व सेवांचे १,२३० कोटी रुपये थकल्याची माहिती सोमवारी लोकसभेत देण्यात आली. सुरुवातील उड्डाणे रद्द आणि नंतर सरकारी र्निबध यामुळे चर्चेत असलेल्या १८ दिवसांमध्ये तर ही रक्कम २४० कोटी रुपयांनी वधारली आहे.
२२ नोव्हेंबपर्यंत ९९० कोटी रुपयांची रक्कम तेल कंपन्या, विमानतळ प्राधिकरण तसेच विदेशी व भारतीय गुंतवणूकदार यांच्यासाठी देय असलेल्या रकमेमुळे वाढली आहे. या दरम्यान १० वैमानिक सोडून गेल्याची वेळ आलेल्या स्पाईसजेटची विमाने तसेच उड्डाणे यांचीही संख्या गेल्या महिन्याभराच्या आत कमालीची रोडावली आहे.
पुन्हा स्वस्त हवाई प्रवासाची स्पर्धा
नाताळ आणि नवे वर्ष नजीक येऊन ठेपले असताना हवाई कंपन्यांमधील कमी दर युद्धाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. वाडिया समुहातील स्वस्त हवाई प्रवासासाठी ओळखले जाणाऱ्या गो एअरने यंदा १,४६९ रुपयांमध्ये पुढील वर्षांसाठीचा हवाई प्रवास उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी सोमवारपासून पाच दिवस आगाऊ तिकिट नोंदणी करणे बंधनकारक आहे.
१ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान अशा सवलतीत प्रवास करता येईल. वर्षांची पहिली तिमाही हवाई प्रवासासाठी कमी प्रतिसादाची मानली जाते. देशांतर्गत हवाई कंपन्यांमधील किमान दर अस्वस्थता यंदाच्या दिवाळीपूर्वी नोंदली गेली होती. तर हवाई प्रवास व्यवसायाला प्रारंभ करताने ऑक्टोबरमध्ये नवागत एअर एशियानेही ९०० रुपयांपुढील सवलतीत विमान प्रवास देऊ केला होता. गो एअर कंपनी देशभरातील २२ ठिकाणांहून आपल्या १९ एअरबसच्या माध्यमातून उड्डाणे घेते.