बँक ऑफ महाराष्ट्र होणार विलीन?

0
52

विशेष प्रतिनिधी
पुणे-देशातील बँकिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करताना स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, सेंट्रल बँक आणि कॅनरा बँक या सात बँकांमध्ये इतर सर्व सरकारी बँका विलीन केल्या जाण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामध्ये पुण्यात मुख्यालय असलेली महाराष्ट्र बँक (बँक ऑफ महाराष्ट्र) ही सेंट्रल बँक ऑफ इंडियात विलीन केली जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुण्यात शुक्रवार आणि शनिवारी ‘ज्ञान संगम’ ही बँकिंग परिषद होत आहे. मोदी हे फक्त शनिवारी उपस्थित असतील. अर्थमंत्री अरुण जेटली, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्यासह सर्व राष्ट्रीय व खासगी बँकांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आदी उच्चाधिकारी या मंथनामध्ये सहभागी होणार आहेत.
बँकांच्या विलिनीकरणासाठी मोदी यांनी याबाबत राजकीय इच्छाशक्ती दाखवून पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. ‘विलिनीकरण करताना बँकिंगप्रणाली (सॉफ्टवेअर) आणि प्रादेशिक विस्तार विचारात घेतले जाणार आहेत. त्यानुसार सात प्रमुख बँकांमध्ये (मेगा बँक) इतर १९ बँकांचा समावेश करण्यात येणार आहे.
या विलिनीकरणानंतर मेगा बँकेत ‘बासल ३’ या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आवश्यक भांडवल उपलब्ध होईल; तसेच खासगी बँकाबरोबरच या राष्ट्रीय बँकादेखील आंतरराष्ट्रीय बँकांशी स्पर्धा करू शकतील, अशी आशा धोरणकर्त्यांना असल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांच्या विलिनीकरणाचा ‘रोडमॅप’ पुढीलप्रमाणे असू शकतो. (‘मेगा बँक’ आणि त्यात विलीन होणाऱ्या संभाव्य बँकांची नावे या क्रमाने)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, अलाहाबाद बँक

कॅनरा बँक : सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक

स्टेट बँक ऑफ इंडिया : या बँकेच्या पाच संलग्न बँका. उदा. स्टेट बँक जयपूर अँड बिकानेर

पंजाब नॅशनल बँक : विजया बँक, देना बँक

बँक ऑफ बडोदा : आयडीबीआय बँक, युनायडेट कमर्शियल बँक

बँक ऑफ इंडिया : ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक