नियोजन आयोग झाले ‘नीती आयोग’

0
13

नवी दिल्ली-कालबद्ध व नियोजनबद्ध विकासासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्थापण्यात आलेला नियोजन आयोग गुंडाळण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. यापुढे नियोजन आयोग ‘नीती आयोग’ म्हणून ओळखला जाणार आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

नियोजन आयोगाची उपयुक्तता संपली असून त्याजागी नवी यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात बोलून दाखवली होती. मात्र, काँग्रेसने केंद्र सरकारच्या या भूमिकेला जोरदार विरोध दर्शवला होता. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनेही याप्रश्नी सरकारवर टीका केली. मात्र, मोदी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून नियोजन आयोगाचे नामांतर करून त्यांनी याची चुणूक दाखवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते.