निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. 182 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत 1 डिसेंबरला 89 जागांसाठी आणि 5 डिसेंबरला 93 जागांसाठी मतदान होणार आहे. हिमाचल विधानसभा निवडणुकीसोबत 8 डिसेंबरला निकाल लागणार आहेत.
निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी गुजरातमध्ये 4.6 लाख लोक प्रथमच मतदान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निष्पक्षतेवर म्हणाले- क्रिकेट सामन्यांत अंपायरवरही प्रश्न उपस्थित होतात
सीईसी राजीव कुमार म्हणाले- जर कोणी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला आणि तो निवडणूक जिंकला तर प्रश्न बंद होतात. निष्पक्ष निवडणुका हे आमचे उद्दिष्ट आहे आणि निवडणूक आयोगाची स्थापना आज झालेली नाही. आमची निःपक्षपातीपणा नेहमीच सर्वश्रुत आहे. क्रिकेटचा सामना असला की दोन्ही पक्ष पंचांना दोष देतात. इथे तिसरा पंच नाही. निवडणूक आयोग आज बनलेला नाही, तो वारसा आहे. पूर्वीपासून निर्माण झालेली निष्पक्षता पुढे नेणे हे आमचे कर्तव्य आहे.
एका मतदारासाठी मतदान केंद्र, 15 जणांची टीम
सीईसी राजीव कुमार यांनी सांगितले की, गीर जंगलातील बनेज गावात राहणारे भरतदास दर्शनदास यांच्यासाठी एक मतदान केंद्र बनवले जाईल. या एकाच मतदाराकडून 15 जणांचे पथक मतदान करून घेण्यासाठी जाणार आहे. ते म्हणाले- भरतदास आपल्या गावाबाहेर पडून मतदान करू इच्छित नाही, म्हणून त्यांच्यासाठी मतदान केंद्र आणि मतदान पथक पाठवले जाईल.
गुजरात निवडणुकीशी संबंधित 4 महत्त्वाचे मुद्दे…
1. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार कोण?
सध्या भाजपकडून भूपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी राज्यात कोणताही बदल होणार नसल्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. भाजपशिवाय काँग्रेस आणि आपदेखील रिंगणात आहेत. मात्र, दोन्ही पक्षांनी अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसबद्दल बोलायचे झाले, तर भरत सोळंकी, अर्जुन मोढवाडिया, शक्तिसिंह गोहिल हे पक्षात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. ‘आप’मध्ये गोपाल इटालिया आणि इशुदान गढवी हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत.
2. ही निवडणूक कशी वेगळी आहे?
ही निवडणूक गतवेळपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे- 2017 मध्ये गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती, परंतु यावेळी आपदेखील या लढतीत सहभागी आहे. त्याचबरोबर पाटीदार आंदोलनाची धगही यावेळी शांत झाली आहे. आंदोलनाचा सर्वात मोठा चेहरा हार्दिक पटेलनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
3. 4 मुद्दे सर्वात महत्त्वाचे, अँटी इन्कम्बन्सीचाही परिणाम
यावेळी 4 मुद्दे गुजरातच्या निवडणुकीवर परिणाम करू शकतात. त्यात मोरबी पूल दुर्घटना, कर्मचाऱ्यांच्या समस्या, महागाई, बंदरात पकडलेली ड्रग्ज. मोरबी पूल दुर्घटनेनंतर निवडणूक या मुद्द्याभोवतीच बंदिस्त झाली आहे. गेल्या 24 वर्षांपासून भाजपची सत्ता असल्याने पक्षाविरोधात अँटी इन्कम्बन्सीचाही प्रभाव आहे.
4. 2 सायलेंट चेहरे जे निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतात
यावेळी गुजरात निवडणुकीत दोन सायलेंट चेहरे चर्चेत आहेत, जे निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतात. यातील एक नाव पाटीदारचे नरेश पटेल यांचे आहे, तर दुसरे नाव कोळी समाजातील सोमाभाई गंडाभाई आहे. नरेश पटेल यांनी आतापर्यंत राजकारणात थेट प्रवेश केलेला नाही, परंतु ते गुजरातमधील 85 लाख लेउवा पटेल समाजातील सर्वमान्य नेते मानले जातात.
पटेल यांनी अनेकवेळा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र पक्षप्रमुखांशी चर्चा होऊ शकली नाही. दुसरीकडे सोमाभाई गंडाभाईही यावेळी गेम चेंजर ठरू शकतात. पाटीदारांनंतर गुजरातमध्ये कोळी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे.
भाजपचे 160 जागा जिंकण्याचे लक्ष्य
यावेळी भाजपने 182 जागांपैकी 160 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा गुरुवारी गांधीनगरला पोहोचणार आहेत. भाजपला आतापर्यंत 4,340 जणांची नावे मिळाली आहेत. सर्वाधिक 1,490 उत्तर गुजरातमधील आहेत. सौराष्ट्रमध्ये 1,163, मध्य गुजरातमध्ये 962 आणि दक्षिण गुजरातमध्ये सर्वात कमी 725 आहेत.
निवडणुकीच्या तारखांना विलंब झाल्याचा आरोप
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास उशीर होण्याचे ठोस कारण निवडणूक आयोगाने अद्याप दिलेले नाही. याआधी हिमाचलच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करायच्या होत्या, पण तसे झाले नाही. गेल्या वेळी (2017) बनासकांठामध्ये आलेला पूर हे विलंबाचे कारण होते. मात्र, तरीही निवडणुकीच्या तारखा 25 ऑक्टोबरला जाहीर झाल्या. दोन टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या.
गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाचा पारा चांगलाच तापला आहे. भाजप गुजरातची सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असून यावेळी 182 जागांपैकी 160 पेक्षा जास्त जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचवेळी भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या सगळ्यात आम आदमी पक्षही या दोघांच्या जागी नवा पर्याय देण्यासाठी विविध आश्वासने देऊन जोरदार प्रयत्न करत आहे.
1960 मध्ये महाराष्ट्रापासून वेगळे झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या गुजरातमध्ये 1962 मध्ये पहिली निवडणूक झाली. राज्यात काँग्रेस प्रदीर्घ काळ सत्तेत राहिली, पण 1995च्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तेव्हा पक्षाच्या सर्व नव्या निर्णयांची प्रयोगशाळा गुजरात बनली. 2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून आव्हान निश्चितच मिळाले, पण आपली सत्ता टिकवण्यात भाजपला यश आले.