काँग्रेस अरुणाचल ते गुजरात भारत जोडो यात्रा काढणार

0
15

रायपूर(वृत्तसंस्था)-– छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या 85 व्या अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, पक्ष अरुणाचल प्रदेश ते गुजरातपर्यंत भारत जोडो यात्रा काढण्याचा विचार करत आहे. तर राहुल गांधी यांनी 32 मिनिटांचे भाषण केले. भाषणात राहुल यांनी भारत जोडो यात्रा, अदानी हिंडेनबर्ग प्रकरण, जयशंकर यांचे चीनवरील वक्तव्य आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

1. जेव्हा गळाभेट घ्यायचो तेव्हा ट्रान्समिशनसारखे व्हायचे

राहुल म्हणाले- आम्ही कन्याकुमारी ते श्रीनगर अशी चार महिने भारत जोडो यात्रा केली. तुम्ही व्हिडिओमध्ये माझा चेहरा पाहिला, पण लाखो लोक आमच्यासोबत चालले. आम्ही पाऊस, गरमी आणि बर्फात एकत्र चाललो. खूप काही शिकायला मिळाले. पंजाबमध्ये एक मेकॅनिक येऊन मला भेटला हे तुम्ही पाहिले असेल. मी त्याचा हात धरला आणि मी त्याची वर्षांची तपश्चर्या, त्याची वेदना आणि दु:ख ओळखले.

लाखो शेतकर्‍यांशी हस्तांदोलन करायचो, मिठी मारली की लगेच एक ट्रान्समिशन व्हायचे. सुरुवातीला तुम्ही काय करता, तुम्हाला किती मुले आहेत, अडचणी काय आहेत यावर बोलण्याची गरज होती. हा प्रकार दीड महिना चालला आणि त्यानंतर काही बोलायची गरज नव्हती. हात धरून, मिठी मारताच त्यांची वेदना एका सेकंदात समजत होती. काही न बोलता मला काय बोलायचे ते त्यांना समजून यायचे.

2. यात्रा सुरु केली तेव्हा जुने दुखणे सुरु झाले
राहुल गांधी म्हणाले, ‘तुम्ही बोटीची शर्यत पाहिली असेल. मी बोटीत बसलो होतो. माझ्या पायात तीव्र वेदना होत होत्या. त्या फोटोत मी हसत होतो, पण मनातल्या मनात रडत होतो. मी यात्रा सुरू केली. मी एक तंदुरुस्त माणूस आहे. 10-12 किलोमीटर सहज धावतो. 20-25 किमी चालण्यात काय मोठी गोष्ट आहे याचा अहंकार होता.

ही जुनी जखम होती. कॉलेजमध्ये फुटबॉल खेळताना दुखापत झाली होती. मी धावत होतो, तेव्हा जखम झाली. ती वेदना नाहीशी झाली होती. मी यात्रा सुरू करताच, वेदना परत आली. तुम्ही माझे कुटुंब आहात त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की, मी सकाळी उठल्यानंतर विचार करायचो की, आता चालायचे कसे. त्यानंतर विचार यायचा 25 किलोमीटर नाही तर 3 हजार 500 किलोमीटर चालायचे आहे, कसे चालणार?

मग कंटेनरमधून खाली उतरून चालणे सुरु करत होतो. लोकांना भेटायचो. पहिल्या 10-15 दिवसांत अहंकार आणि गर्व नाहीसा झाला. कारण भारत मातेने संदेश दिला होता की, तू कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालण्यासाठी निघाला आहेस तर हृदयातून अहंकार काढून टाक. नाहीतर चालू नका. मला हे ऐकावे लागले. ते न ऐकण्याची ताकद माझ्यात नव्हती.’

3. आजपर्यंत माझ्याकडे घर नाही
राहुल म्हणाले, ‘हळूहळू माझा आवाज शांत झाल्याचे माझ्या लक्षात आले. जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचल्यावर पूर्णपणे नि:शब्द झालो. मेडिटेशन करताना होतो तास गप्प झालो. आई बसली आहे. मी लहान असताना 1977 ची गोष्ट होते. निवडणूक आली, मला त्यावेळी काही माहिती नव्हते. घरात विचित्र वातावरण होते. मी आईला विचारले काय झाले मम्मी. आई म्हणाली आपण घर सोडत आहोत.

तोपर्यंत मला घर आपल वाटत होतं. मी आईला विचारले की आपण घर का सोडतोय? आईने मला पहिल्यांदा सांगितले की, हे आपले घर नाही. हे सरकारचे घर आहे. आता इथून निघायचे आहे. मी कुठे जायचे असे विचारल्यावर ती म्हणाली, कुठे जायचे ते माहित नाही. मी आश्चर्यचकित झालो. मला वाटलं ते आमचं घर आहे. 52 वर्षे झाली माझ्याकडे घर नाही. आजपर्यंत नाही.’

4. सर्वसामान्यांच्या वेदना मी सांगू शकत नाही
राहुल म्हणाले, ‘यात्रेत माझ्यासोबत अनेकजण होते. लाखो होत होते. मी विचार करत होतो, मी काय करत आहे. उद्देश काय आहे. मी माझ्या कार्यालयातील सहकाऱ्यांना बोलावले. त्यांना विचारले, गर्दी आहे तर धक्का लागेल, जखमा होतील. आता माझ्या आजूबाजूला जी 20-25 फुटांची जागा आहे, तेच आपले घर आहे. हे घर आपल्यासोबत चालेल. पहाटे 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे घर सोबत चालेल.

मी सर्वांना सांगितले की, या घरात जो कुणी येईल, मग तो गरीब असो वा श्रीमंत, तरुण असो वा बालक, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही राज्याचा असो, देशी असो की विदेश, प्राणीही असला तरी त्याला आपल्या घरी आल्याचे समाधान मिळाले पाहिजे. तो जेव्हा येथून जाईल, तेव्हा त्याच्या मनात स्वतःचे घर सोडून जात असल्याची भावना निर्माण झाली पाहिजे. हिंदुस्तानी नागरिकांनी – महिलांनी या देशाविषयी मला जे सांगितले, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. तरुणांच्या वेदना मी तुम्हाला समजावून सांगू शकत नाही’

5. महिलेने हात धरला तेव्हा मी माझ्या बहिणीला जे प्रेम देतो तेच प्रेम दिले
राहुल गांधी म्हणाले, “एक महिला जवळ आली, मी तिचा हात धरला आणि मला समजले की काहीतरी गडबड आहे. मी माझ्या बहिणीवर ज्याप्रमाणे प्रेम करतो तसेच तिला दिले. ती मला म्हणाली, “राहुल भैया, मी तुला भेटायला आले आहे. माझा नवरा मला मारतोय.” मला हे ऐकायला मिळाले. माझे कुटुंब काही वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमधून स्थलांतरित झाले. मला वाटले की कन्याकुमारीपासून मी माझे घर काश्मीरपर्यंत नेत आहे आणि येथे मी माझ्या घरी परत जात आहे असे दिसते.

6. मोदीजींनी 15-20 लोकांसह लालचौकात तिरंगा फडकावला, आम्ही लाखो लोकांसह
राहुल म्हणाले, “नरेंद्र मोदीजींनी भाजपच्या 15-20 लोकांसह लाल चौकात ध्वजारोहण केले, भारत जोडो यात्रेने लाखो लोकांसह झेंडा फडकवला, पंतप्रधानांना समजले नाही. एक काश्मिरी आला आणि म्हणाला, मी तुझ्यासोबत तिरंगा घेऊन चालत आहे. तुम्ही आमच्या हृदयात निर्माण केलेला विश्वास. त्याच्यामुळे मी सोबत चालत आहे. भारत यात्रेत लाखो लोक सामील झाले, हे काम राहुल गांधींनी केले नाही, आपल्या कार्यकर्त्यांनी केले.”

7. गांधीजी म्हणायचे की सत्याचा मार्ग सोडू नका, हे सत्तेचा मार्ग सोडत नाहीत
एका नेत्याने एका मुलाखतीत सांगितले की, चीनची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा मोठी आहे, मग आपण त्यांच्याशी कसे लढू शकतो. इंग्रजांशी लढताना आपली अर्थव्यवस्था त्यांच्यापेक्षा मोठी होती का? तुम्हाला ताकदवनाशी लढायचे नाही का? अशा वागण्याला भ्याडपणा म्हणतात. जो आपल्यापेक्षा बलवान आहे त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे ही सावरकरांची विचारसरणी आहे. चीनची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे लढू शकत नाहीत, असे एक मंत्री सांगत आहेत. याला देशभक्ती म्हणतात का? ही कोणती देशभक्ती? जो दुर्बल आहे त्याला मारा आणि जो बलवान आहे त्याला नतमस्तक व्हा. महात्मा गांधी सत्याग्रहाबद्दल बोलत असत. सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. सत्तेसाठी हे लोक काहीही करतील. हे त्यांचे सत्य आहे.

8. भाजप आणि संघ अदानींना का संरक्षण देत आहेत
एका उद्योगपतीविरुद्ध मी संसदेत मोर्चा उघडला. मी एक फोटो दाखवला ज्यात मोदीजी अदानीसोबत विमानात बसले आहेत. मी विचारले काय संबंध आहे. संपूर्ण सरकार, सर्व मंत्री अदानीजींना संरक्षण देऊ लागले. अदानींवर हल्ला करणारा देशद्रोही झाला आणि अदानी देशभक्त झाला. त्या व्यक्तीला भाजप आणि संघ संरक्षण देत आहेत. तुम्ही का संरक्षण करत आहात हा प्रश्न आहे. हजारो कोटी रुपये भारतात पाठवणाऱ्या या शेल कंपन्या कोणाच्या आहेत? यात पैसा कोणाचा आहे? तपास का होत नाही? जेपीसी का स्थापन होत नाही.

रोजगार, शिक्षण व कृषी-शेतकरी कल्याणासारख्या मुद्यांवर होणार चर्चा
रविवारी अर्थात आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहुल यांच्या भाषणानंतर 3 प्रस्तावांवर चर्चा होईल. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दुपारी 2 वाजता संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता मेगा रॅलीने अधिवेशनाचा समारोप होईल. या अधिवेशनात कृषी-शेतकरी कल्याण, युवा रोजगार, शिक्षण व सामाजिक न्याय व सक्षमीकरण या प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. अधिवेशनाच्या समारोपाला होणाऱ्या मेगा रॅलीला सुमारे 2 लाख जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडच्या 85 व्या काँग्रेस अधिवेशनात भावुक होत राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत देऊन सर्वांनाच चकित केले. सोनिया म्हणाल्या, सन 2004 आणि 2009 मध्ये पक्षाची कामगिरी असो अथवा मनमोहनसिंग यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय. या दोन्ही गोष्टी वैयक्तिकदृष्ट्या मला अत्यंत समाधान देणाऱ्या ठरल्या. आता ‘भारत जोडो’ यात्रेने माझा डाव संपुष्टात येत आहे याचा सर्वाधिक आनंद वाटतोय.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले – देशात द्वेषाचे वातावरण आहे. सरकार रेल्वे, जेल, तेल सर्वकाही आपल्या मित्रांना विकत आहे. दिल्ली सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा DNA गरीब विरोधी आहे.

काँग्रेसची घटना बदलण्यात आली. त्यापैकी प्रमुख काही गोष्टी…

  • AICC प्रतिनिधी आणि सर्व पदांपैकी 50 टक्के पदे अनुसूचित जाती, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असतील.
  • 50 टक्के पदे 50 वर्षांखालील व्यक्तींकडे असतील.
  • 1 जानेवारी 2025 पासून काँग्रेसमध्ये पेपर मेंबरशिप नसेल, फक्त डिजिटल सदस्यत्व असेल.
  • काँग्रेसच्या फॉर्ममध्ये थर्ड जेंडरची चर्चा होणार, आता फॉर्ममध्ये आई आणि पत्नीचेही नाव लिहिले जाणार आहे.
  • ब्लॉक, जिल्हा आणि राज्य पातळीवर जिथे जिथे काँग्रेसचे निवडून आलेले सदस्य आहेत. ते सर्व प्रतिनिधी असतील.
  • सदस्यत्वापासून सक्षमीकरणापर्यंत आता 6 PCC प्रतिनिधी सदस्यांवर एक AICC सदस्य निवडला जाईल. आतापर्यंत 8 जणांवर निवड केली जात होती.
  • AICC सदस्यांची संख्या 1240 वरून 1653 पर्यंत वाढेल.

पहिल्या दिवशी 24 फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारी काय झाले…

सुकाणू समितीची बैठक झाली. यामध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) निवडणुका होणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सहभागी सदस्यांनी एकमताने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना CWC सदस्य निवडीचे अधिकार दिले. यासोबतच एससी-एसटी, ओबीसी, तरुण आणि महिलांना संघटनेत 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.