दिवाळी अंक परंपरा दिल्लीतील मराठी समुदायासाठी साहित्यिक मेजवानी-शुभांगी चिपळूणकर

0
8
दिवाळी अंक प्रदर्शनाची सुरूवात
नवी दिल्ली, 11: दिवाळी अंक परंपरा दिल्लीतील मराठी समुदायासाठी साहित्यिक मेजवानी असून, मराठी साहित्याच्या माध्यमातून सांस्कृतिक जडणघडणीत हे कार्यालय नेहमीच प्रयत्नशील असल्याचे उद्गार, दिल्ली हाट येथे महाराष्ट्र खाद्य संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या महाराष्ट्र फुडच्या संचालिका श्रीमती शुभांगी चिपळूणकर यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रातील दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटनावेळी केले.
उद्घाटनाप्रसंगी श्रीमती चिपळूणकर यांनी “दिल्लीतील मराठी माणसांसाठी दिवाळी अंक प्रदर्शन म्हणजे महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसांमध्ये राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच मराठी साहित्याचा वारसा दिल्लीतील मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम या प्रदर्शनातून साधला जात असल्याचे सांगत, या उपक्रमाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी श्रीमती चिपळूणकर यांना रोपटे देऊन यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दिवाळी अंकांची परंपरा 1909 पासून राज्यात सुरू झाली आहे आणि या परंपरेचा गौरवशाली इतिहास आज 116 वर्षांपर्यंत पोहोचला आहे. विविध विषयांना वाहिलेल्या या दिवाळी अंकांमधून मराठी वाचकांना साहित्यिक आनंद अनुभवता येईल यासाठी हे कार्यालय सदैव तत्पर असते. मागील 15 वर्षांपासून, परिचय केंद्र दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन करत आलेले आहे.
यंदाच्या प्रदर्शनात गृहलक्ष्मी, आवाज, मिळून साऱ्या जणी, चार चौघी, श्री व सौ, अंतर्नाद, राज्यातील खाद्य संस्कृती, जत्रा, किशोर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत-दीपोत्सव, साप्ताहिक सकाळ, आणि झी मराठी यांसह एकूण 107 विविध दिवाळी अंकांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले आहे.
दिवाळी हा सण केवळ आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नसून त्याला बौद्धिकतेची जोड देण्यासाठी दिवाळी अंकांची परंपरा अस्तित्वात आहे. या अंकांमधून नवोदित आणि प्रतिष्ठित लेखकांचे कथा, कविता, तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील लेख एकाच अंकात उपलब्ध होतात, त्यामुळे वाचकांना एकाच ठिकाणी विविध विषयांवरील साहित्य अनुभवता येते.
या प्रर्दशनाच्या निमित्ताने दिल्लीत राहणाऱ्या मराठी वाचकांना आवाहन करण्यात येत आहे की, या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी या साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा. हे प्रदर्शन आजपासून सुरू झाले असून, शुक्रवारी 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.