मुंबई विद्यापीठाची आशियाई क्रमवारीत मोठी झेप

0
17

गतवर्षीच्या तुलनेत सर्वच निकषात उत्कृष्ट कामगिरी करत मोठी सुधारणा

मागील वर्षीच्या १९ गुणांकनावरून ३४ गुणांसह दर्जेदार कामगिरी

क्यूएस आशिया रँकिंग जाहीर, आशिया क्रमवारीत ६७ वरून ५२ क्रमांकावर झेप

मुंबई, ११ नोव्हेंबर – क्वाकरेली सायमंड ( क्यूएस) यांनी जाहीर केलेल्या आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये मुंबई विद्यापीठाने दर्जेदार कामगिरी करत मोठी झेप घेतली आहे. मुंबई विद्यापीठाने गतवर्षीच्या तुलनेत सर्वच निकषात मोठी सुधारणा करत २९१ ते ३०० या बँडमधून बाहेर पडत थेट २४५ क्रमांकावर झेप घेतली आहे. विद्यापीठाने मागील वर्षीच्या तुलनेत सर्वसाधारण गुणात उल्लेखनिय कामगिरी करत १९ गुणांवरून ३४ गुण प्राप्त केले आहेत. तर दक्षिण आशिया क्रमवारीत उत्कृष्ट कामगिरी करत ६७ क्रमांकावरून ५२ क्रमांक पटकावला आहे. नुकतीच आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली आहे.

क्वाकरेली सायमंड ( क्यूएस) आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ अहवालानुसार मुंबई विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत रँकिंगच्या सर्व निकषात भरीव सुधारणा केली आहे. धोरणात्मक सुधारणेला प्राथम्य देऊन संस्थात्मक प्रतिष्ठा, रिसर्च आऊटपूट, वैश्विक सहभागिता अशा अनुषंगिक निकषांत विद्यापीठाने मोठी सुधारणा केली आहे. पेपर्स पर फॅकल्टी, नियोक्ता प्रतिष्ठा, शैक्षणिक प्रतिष्ठा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क, विद्याशाखा-विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय विद्याशाखा गुणोत्तर, आणि पीएचडी असलेले शिक्षक यांसारख्या महत्त्वाच्या निकषात उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाने ७६ टक्क्यांनी सुधारणा करत दर्जेदार कामगिरी केली आहे. विद्यापीठाने इनबाऊंड आणि आऊटबाऊंड एक्सचेंज स्टुडेंट कॅटेगरीमधील मागील स्तर टिकवून ठेवले आहे.

क्युएसच्या विविध ११ निकषात मुंबई विद्यापीठाने सर्वाधिक पेपर्स पर फॅकल्टी निकषात सर्वाधिक ९०.६ गुण प्राप्त केले आहेत. त्यापाठोपाठ नियोक्ता प्रतिष्ठा ६४.१, शैक्षणिक प्रतिष्ठा ३४.६, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर ३२.६, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क २१.३, विद्याशाखा-विद्यार्थी गुणोत्तर १४.२, आंतरराष्ट्रीय विद्याशाखा गुणोत्तर ९.१, पीएचडी असलेले शिक्षक ४.८, सायटेशन पर पेपर ३.८, आऊटबॉऊंड एक्सचेंज स्टूडेंट्स १.१ आणि इनबॉऊंड एक्सचेंज स्टुडेंट १ अशा विविध निकषात विद्यापीठाने उत्तम कामगिरी केली आहे.

“विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि साश्वत प्रयत्नांची ही फळनिश्पती आहे, या निकालाचे समाधान असून भविष्यात रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी सायटेशन पर पेपर आणि स्टुडेंट एक्सचेंज प्रोग्राम या निकषांवर अधिक भर देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील.”

प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ