नवी दिल्ली, दि. ९ – संपूर्ण भारताचं लक्ष लागलेल्या बिहारच्या निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या असून ८ नोव्हेंबर २०१५ रोजी म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी नितिशकुमारांना बिहारची जनता पुन्हा संधी देते की नरेंद्र मोदींच्या भाजपाला निवडते हे स्पष्ट होणार आहे. बिहारमध्ये ६.६ कोटी मतदार २४३ विधानसभेच्या जागांसाठी मतदान करणार असून १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर अशा पाच टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. आठ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून १२ नोव्हेंबरला म्हणजे दिवाळी पाडव्याला निवडणुकीची प्रक्रिया संपलेली असेल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.पहिला टप्पा 12 ऑक्टोबर, दुसरा 16 ऑक्टोबर, तिसरा 28 ऑक्टोबर,चौथा 1 नोव्हेंबर तर पाचव्या टप्प्यात 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आठ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी पत्रकार परिषदेत बिहार निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला.
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम अहमद झैदी यांनी बिहारच्या निवडणुका अत्यंत पारदर्शीपणे आणि कुठलाही गैरप्रकार न होता पार करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले. बिहारमध्ये जवळपास ४७ विधानसभा क्षेत्र डाव्यांच्या कट्टरतावादाने व्यापलेली आहेत तर २९ जिल्ह्यांमध्ये नक्षलींचा प्रभाव आहे. परंतु पुरेसा पोलीस बंदोबस्त तसेच सैन्याच्या राखीव दलाच्या सहाय्याने निवडणुका शांततेत पार पाडण्यात येतील असे झैदी म्हणाले. आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, निवडणुकांच्या ओपिनियन पोलवर बंदी घालण्यात आली आहे.