विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा

0
26

वृत्तसंस्था/नवी दिल्ली-विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचा शोध सुरू असताना तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांनी आता पक्षीय राजकारणाला सोडून राष्ट्रीय स्तरावर व्यापक विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. पश्‍चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची उमेदवारी नाकारल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यशवंत सिन्हा यांचे नाव पुढे केले.
तृणमूल काँग्रेस पक्षात जो सन्मान आणि प्रतिष्ठा भेटली त्याबद्दल मी ममता बॅनर्जी यांचे आभार मानतो. एका मोठय़ा राष्ट्रीय कारणासाठी तसेच विरोधकांच्या ऐक्यासाठी मला पक्षाला बाजूला ठेवावे लागणार आहे. ममता बॅनर्जी माझा हा निर्णय मान्य करतील याची मला खात्री आहे, असे ट्विट यशवंत सिन्हा यांनी केले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मला उमेदवारी देण्याचा विचार केला गेला. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे असे सिन्हा म्हणाले. तर याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता यशवंत सिन्हा यांच्या नावावर विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती पदाचा उमेदवार शिक्कामोर्तब करण्यात आले. तसा प्रस्ताव ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या नेत्यांसमोर मांडण्यात आला होता.