कश्मीर व झारखंडमध्ये काँग्रेसला धक्का

0
5

नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं गेलेल्या काँग्रेसची परिस्थिती अजूनही काही सुधारलेली नाही. जम्मू काश्मीर आणि झारंखडमध्ये मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेसला नाकारून चांगलाच धक्का दिलाय. दोन्ही राज्यात काँग्रेसचा पराभव झालाय. काश्मीरमध्ये काँग्रेसने कसाबसा दुहेरी आकडा गाठला तर झारखंडमध्ये सुपडा साफ झालाय. त्यामुळे पुन्हा काँग्रेसला हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्याची वेळ आलीये.
15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला जनतेनं स्पष्ट नकार देत ‘घरचा रस्ता’ दाखवला. आज जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. इथं मोदी मॅजिकपुढे काँग्रेस गारद झाली. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला 12 जागा मिळाल्यात तर झारखंडमध्ये 9 जागांवर समाधान मानावे लागले. 2009 च्या निवडणुकीत काश्मीरमध्ये काँग्रेसला 17 जागा पटकावल्या होत्या तर झारखंडमध्ये 21 जागा जिंकल्या होत्या. मागील निकाल पाहता काँग्रेसला चांगलाच पराभवाचा धक्का बसलाय.
लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र, हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. यूपीए सरकारने सलग दोन टर्म सत्ता उपभोगली खरी पण लोकसभेच्या रणांगणात मोदी लाटेपुढे यूपीएचं ‘जहाज’ तळाला लागलं. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत दिल्लीचे तख्त राखले. काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षाची जागाही मिळाली नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसचं पानिपत झालं.