नागपूर रेल्वेस्थानकाची नव्वदी पूर्ण

0
14

नागपूर : सावनेर येथून आणलेल्या वलुवा नावाच्या दगडांनी तयार केलेले उंच स्तंभ, सुंदर नक्षीकामाने सुशोभित केलेल्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ऐतिहासिक नागपूर रेल्वेस्थानकाने ९0 वर्ष पूर्ण केली आहेत.
अशाप्रकारचे वैशिष्ट्य असलेले रेल्वेस्थानक जगात मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहेत. ऐतिहासिक नागपूर रेल्वेस्थानकाच्या इमारतीचे लोकार्पण १५ जानेवारी १९२५ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर फ्रँक यांनी केले होते.
सध्या नागपूर रेल्वेस्थानकावर आठ प्लॅटफार्म उपलब्ध आहेत. येथून पूर्व, पश्‍चिम, उत्तर आणि दक्षिण या चारही दिशांना रेल्वेगाड्या जातात. नागपूर रेल्वेस्थानक देशाच्या केंद्रस्थानी असून, येथे प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या वैभवाला आणि विशिष्ट शिल्पकलेला पुनस्र्थापन करण्यासाठी इमारतीवर विशेष पद्धतीने ऊर्जा बचत करण्यासाठी ‘एलईडी’वर आधारित प्रकाशयोजना करण्यात आली आहे. सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून दिवसाकाठी मेल आणि एक्स्प्रेस मिळून ९२ प्रवासी गाड्या तर २00 मालगाड्यांचे संचालन करण्यात येते. कालावधीनुसार येथे संगणकीकृत आरक्षण यंत्रणा, संगणकीकृत अनारक्षित तिकीट यंत्रणा, वेटिंग रूम, वातानुकूलित उच्च श्रेणी प्रतीक्षालय, विश्रामालय, बेस किचन, पार्किंगची व्यवस्था आणि इतर प्रवासी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.नुकतेच रेल्वेस्थानकावर होम प्लॅटफार्म, बेस किचन तसेच विश्रामगृहाचे आधुनिकीकरण या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय ऐतिहासिक वाफेचे इंजिनही रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर घालत आहे.