काँग्रेसवर नामूष्की, नेताही गेला अन् वेबसाईटही

0
8

नवी दिल्ली, दि. २१ – विधानसभा निवडणुकीमुळे ऐन थंडीतही दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून उमेदवारी न मिळाल्याने पक्षाला रामराम ठोकणा-या नेत्यांची संख्याही वाढत आहे. मात्र काँग्रेसच्या एका नेत्याने पक्ष सोडताना त्याने दिल्ली प्रदेश काँग्रेससाठी सुरु केलेली वेबसाईटही बंद करुन टाकल्याने काँग्रेसची नाचक्की झाली आहे.
३० वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असणारे संजय पूरी यांना पक्षाने विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले नसल्याने पुरी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. संजय पूरी हे हायटेक नेते म्हणून ओळखले जात असून त्यांनी २००८ मध्ये दिल्लीप्रदेश काँग्रेससाठी DPCC.co.in आणि काँग्रेससंदेश अशा दोन वेबसाईटही सुरु केल्या होत्या. पक्षाला सोडचिठ्ठी देताना त्यांनी या दोन्ही वेबसाईटही बंद करुन टाकल्या. ‘या दोन्ही वेबसाईट मी स्वत: सुरु केल्या असून त्या मी स्वतःच्या जबाबदारीवर चालवत होतो. पण ज्या पक्षाने माझा विश्वासघात केला त्यांच्यासाठी मी माझी वेबसाईट का देऊ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संजय पुरी यांनी एकीकडे सोडचिठ्ठी दिल्याचे म्हटले असले तरी दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हे वृत्त फेटाळले आहे. पुरींसोबतचे मतभेद दुर झाले असून ते पक्षातून गेलेले नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दिली.