परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात मुख्यमंत्री यशस्वी होतील-रावसाहेब पाटील दानवे

0
6

मुंबई-स्वित्झर्लंडमधील डावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात निश्चितच यश मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केला.

परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री फडणवीस मुंबईहून रवाना झाले. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळात मा. फडणवीस यांचा समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मा. रावसाहेब पाटील दानवे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश भाजपाचे संघटनमंत्री रविंद्र भुसारी, सहसंघटनमंत्री सुनील कर्जतकर, माजी आमदार श्रीकांत जोशी, भाजपा कार्यालय सहसचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.

मा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांमध्ये मुंबई व महाराष्ट्राची प्रतिमा चांगली आहे. आता केंद्रात आणि राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार असून गुतंवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सरकार कटिबद्ध आहे. देशामध्ये उत्पादन वाढावे आणि रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ ही योजना सुरू केली आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा दावोस परिषदेतील सहभाग हा राज्यात परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारा आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला हातभार लावणारा ठरेल.

ते म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यामुळे उद्योगधंद्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनात पारदर्शीपणा आणण्याबरोबरच उद्योगांना लागणारे परवाने एक खिडकी योजनेतून वितरित करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गुंतवणूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारचा सकारात्मक प्रयत्न आहे.

जागतिक वित्तीय परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने होत असलेल्या या परिषदेत जगभरातील प्रमुख उद्योजक, व्यापारी व बँकींग क्षेत्रातील तज्ञ तसेच विविध देशांचे नेते यांची खास उपस्थिती असते. यंदाच्या जागतिक वित्तीय परिषदेसाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळात केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संधी दिली आहे. त्यावरुन केंद्र सरकार ही राज्यात उद्योगांमध्ये गुंतवणूक होण्यास किती उत्सूक आहे, हे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.