नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.11ः- होस्टेलच्या फीमध्ये भरमसाठ वाढ, ड्रेस कोड आणि संचारबंदी या विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाविरोधात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने आंदोलन छेडले आहे. सोमवारी विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढला असून यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी येथे मोठा पोलीस फौजफाटाही तैनात आहे.
या मोर्चामध्ये शेकडो जेएनयूचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. फ्रीडम स्वेअरपासून एआयसीटीई ऑडिटोरिअम इथपर्यंत निघालेल्या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी भरमसाठ फी वाढीविरोधातील बॅनर्स झळकवले आहेत. दरम्यान, एका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याने एएनआयशी बोलताना सांगितले, “गेल्या १५ दिवसांपासून आम्ही याविरोधात आंदोलन करीत आहोत. मात्र, कुलगुरु आमच्याशी बोलण्यास इच्छुक नाहीत. विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर होस्टेलची फी वाढवली आहे. विद्यापीठातले ४० टक्के विद्यार्थी गरीब कुटुंबातून येतात. त्यामुळे विद्यापीठाचा हा फी वाढीचा निर्णय अशा विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे.”दुसऱ्या एका आंदोलक विद्यार्थ्याने सांगितले, “जेएनयू हे अनुदानित विद्यापीठ आहे त्यामुळे इथे गरीब विद्यार्थीही शिक्षण घेऊ शकतात. जर विद्यापीठ होस्टेलची फी ६ ते ७ हजार रुपयांच्यावर गेली असेल तर गरीब विद्यार्थी इथे कसे शिक्षण घेऊ शकतील?”
दरम्यान, आक्रमक होत पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू उपस्थित होते, त्यावेळी देखील विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन केले. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा नेता आयशे सिंह याने सांगितले की, “गेल्या दोन आठवड्यापासून जेएनयूचे विद्यार्थी नव्या होस्टेल मॅन्युअलविरोधात आंदोलन करीत आहेत. होस्टेलच्या फीमध्ये वाढ करण्यात आली आहे, कर्फ्यू तसेच ड्रेसकोड लागू करुन अनेक निर्बंध आणण्यात आले आहेत.”




