एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याला अखेर मुहूर्त लागला! फोन करून दिली सोडचिठ्ठी

एकनाथ खडसे यांनी आज फोन करून भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला

0
554

मुंबई(वृत्तसंस्था)दि.21ः- गेल्या अनेक दिवसांपासून कथित मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असलेले एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त अखेर लागला. त्यांनी फोन करून आज भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसने ते आपल्या पक्षात येत असल्याची घोषणा केली. एकनाथ खडसे 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. एकनाथ खडसे यांनी आज फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत असेही जयंत पाटील म्हणाले. आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसांत प्रवेश दिला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

खडसेंचे महाविकास आघाडीत स्वागत -उद्धव ठाकरे

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्यांना एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली. त्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना, एकनाथ खडसे यांचे महाविकास आघाडीमध्ये स्वागत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. खडसेंना महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणते पद मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. तरीही त्यांना कृषीमंत्री पद दिले जाणार अशी चर्चा आहे.

एकनाथ खडसे भाजपवर नाराज

भारतीय जनता पक्षाकडून गेल्या साडेचार वर्षांपासून डावलले जात असल्यामुळे एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विशेष राग आहे. पक्षातील केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांना भेटूनही उपयोग झाला नाही, याची त्यांना खंत आहे. विधानसभा, विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेतही डावलले गेल्याने त्यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेत्यांशी चर्चा केल्यामुळे या पक्षांतराच्या वृत्ताला पुष्टी मिळाली होती.

रक्षा खडसे भाजपतच राहतील; रोहिणी यांचाही प्रवेश शक्य

भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे मात्र भाजप सोडणार नाहीत. त्यांच्या मदतीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारीही पक्षातील राहातील, असे ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येते. लोकसभेची मुदत संपल्यानंतर त्यांचेही पक्षांतर हाेईल, असे सांगण्यात येते आहे.

जळगाव मनपात भूकंप :

भाजपची सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेला खडसेंकडून प्रथम लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून ही मनपा काढून घ्यायची किंवा बरखास्त करायची, असे सूत्र असू शकते.

रोहिणी यांना उमेदवारी

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते आहे.