मॅन ऑफ द मॅच मात्र तेजस्वी यादव; चिराग पासवान, ओवेसी व मायावतींचा महाआघाडीच्या मतांवर डल्ला

0
197

बिहारची निवडणूक हे एक कोडेच ठरले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यात ठोस निकाल स्पष्ट होऊ शकले नाहीत. दुपारपासूनच एनडीए सातत्याने आघाडीवर दिसत होती. पाठोपाठ महाआघाडीही दोनच पावले मागे होती. अखेर मध्यरात्री १२ च्या सुमारास स्पष्ट झाले की नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएच बहुमताच्या जादुई आकड्यांपर्यंत पोहोचली. कोरोनाकाळात स्थलांतराचे सर्वाधिक चटके सोसणाऱ्या बिहारच्या नागरिकांनी पुन्हा एनडीएवरच विश्वास टाकल्याचे यातून स्पष्ट झाले. तथापि, सीएमपदाचे उमेदवार नितीशकुमार यांच्या जदयूची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. तरीही ते मुख्यमंत्री होतील, मात्र आता सरकारमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप असेल, हेही स्पष्ट झाले. जदयूपेक्षा संख्याबळ वाढल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आता मुख्यमंत्रीही आमचाच हवा, अशी मागणीही लगोलग करून टाकली. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी मात्र बिहारमध्ये नितीशच मुख्यमंत्री असतील, याचा पुनरुच्चार केला. नितीशकुमार यांच्या पीछेहाटीस चिराग पासवान कारणीभूत ठरले. ३० मतदारसंघांत त्यांच्यामुळे जदयूचा पराभव झाला.

भाजप, राजद व जदयू या तिन्ही पक्षांनी विजयाचे दावे केले. शेवटच्या टप्प्यात तणाव इतका वाढला की नितीश यांच्या निवासस्थानी दोन-अडीच तास एनडीएच्या नेत्यांची खलबते सुरू होती. तथापि मध्यरात्री दोन वाजेपर्यंत निकालांची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. दुसरीकडे, राजद व काँग्रेसने रात्रीच निवडणूक आयोगाकडे मतमोजणी प्रक्रियेत गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या.

चिराग : लोजपने वेगळी चूल मांडली नसती तर एनडीएला आणखी ३० जागा

> चिराग यांनी ११२ उमेदवार जदयूच्या विरोधात उभे केले. यातील ३० जागी जदयूचा पराभवाचा फरक लोजपला मिळालेल्या मतांपेक्षा कमी होता.

ओवेसी : २० जागांवर महाआघाडीला फटका, यापैकी १२ एनडीच्या वाट्याला

> मुस्लिमबहुल २० जागांवर भाजपने २०१५ ला केवळ ३ जागा जिंकल्या होत्या. यंदा मतांचे विभाजन झाल्याने भाजपला फायदा झाला.

मायावती : ७४ जागांवर उमेदवार, एक विजयी, इतरांकडून मतविभाजन

> बसपाने उमेदवार दिलेल्या ७४ जागांवर एनडीएने ६०% पेक्षा जास्त जागा जिंकल्या. किंवा रात्री उशिरापर्यंत आघाडी कायम होती.

नितीश : शेवटच्या निवडणुकीचा डाव यशस्वी, अखेरच्या टप्प्यामुळे दिलासा

> तिसऱ्या टप्प्यातील ७८ जागांच्या मतदानापूर्वी ही माझी अखेरची निवडणूक असल्याचे नितीश म्हणाले. यातील ४७ जागांवर एनडीएचा विजय.

जदयू-भाजपशी संबंधित ५ प्रश्न

> या विजयाचे सर्वात मोठे कारण काय?

पीएम नरेंद्र मोदी आणि सीएम नितीशकुमार यांची प्रतिमा. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा परिणाम बऱ्याच मर्यादेपर्यंत रोखता आला.

> हे जदयू-भाजपचे मोठे यश आहे का?

नाही. कारण महाआघाडीने काट्याची लढत दिली. राजकारणात फक्त ५ वर्षांपूर्वी आलेल्या तेजस्वींमुळे निकाल शेवटपर्यंत गुलदस्त्यात.

> काट्याची लढत होण्याचे कारण काय?

तेजस्वींचा रोजगाराचा मुद्दा. युवावर्ग जोडला. भाजपच्या १५ वर्षे जुन्या जंगलराजच्या मुद्द्याशी २० वर्षांचा युवा मतदार कनेक्ट झाला नाही.

> जदयूच्या जागा कमी कशा झाल्या?

त्याचे सर्वात मोठे कारण लोजप. दुसरे मोठे कारण लोकांना नितीश सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

> नाराजी सरकारबाबत होती, भाजपबाबत नाही?

नितीशविरोधातच जास्त नाराजी होती. त्यामुळे मोदी मंचावरून म्हणाले की, आमची आणि नितीश यांची सोबत साडेतीन वर्षांचीच आहे.

> महाआघाडीचे सरकार का स्थापन झाले नाही?

काँग्रेस सर्वात कमकुवत बाजू ठरली. असदुद्दीन ओवेसींच्या पक्षामुळे सीमांचलमध्ये ११ जागांवर महाआघाडीला फटका बसला.

> तेजस्वीची नाेकरीची ऑफर चालली नाही?

बिहारमध्ये नाेकरी हाच यशस्वी फॉर्म्युला आहे. तेजस्वींनी तर थेट १० लाख नाेकऱ्यांचे पॅकेज दाखवले. परिणामी राजद सर्वात माेठा पक्ष ठरला.

> तेजस्वींच्या हाती काहीच लागले नाही का?

नाही. ते एक परिपक्व नेता म्हणून पुढे आले. एकट्या तेजस्वीच्या चेहऱ्याच्या बळावर १११ जागा जिंकणे हे माेठे यश आहे.

> लालू तुरुंगाबाहेर असते तर सत्ता आली असती?

कदाचित नाही. हाेऊ शकते एनडीए लालूंचा चेहरा दाखवून लाेकांना समजावण्यात यशस्वी झाले असते की जंगलाराज पुन्हा परत येईल.

> मोदींबद्दल तेजस्वी का बाेलले नाही ?

पंतप्रधानांच्या प्रतिमेबद्दल बाेलले तर उलट परिणाम हाेईल याची जाणीव तेजस्वींना हाेती. माेदींची टीकाही त्यांनी आशीर्वाद मानली.