
औरगांबाद,दि.17ः खान्देशनंतर आता मराठवाड्यातही भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार आणि राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. गायकवाड यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. त्यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. जयसिंगराव गायकवाड लवकरच राष्ट्रवादी सामील होणार आहेत. मंत्रमुग्ध भाषणासाठी गायकवाड ओळखले जातात. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’ अशी मागणी केली जात होती.
जयसिंगराव गायकवाड मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. जयसिंगराव गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. त्यांनी दोनवेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. गेल्या काही वर्षांपासून जयसिंगराव गायकवाड सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यापूर्वी त्यांनी केंद्र आणि राज्यात काम केले आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांच्या जाण्याची किंमत भाजपला मोजावी लागू शकते.