संघभूमीत घटकपक्षांचा भाजपला इशारा

0
5

नागपूर ,दि.30- : घटकपक्षांच्या मदतीने भाजपा सत्तेत आली आहे. आता मित्रपक्षांना किरकोळ समजले जात आहे. भाजपने आपल्याला फसवलं आहे. यापुढे भाजपला मंत्री, महामंडळाची भीक मागायची नाही. हा विषयच इथचं बंद करू. इथून पुढे मागायचे नाही. गरज पडली तर इंगा दाखवू व भाजपची सत्ता उलटून टाकू, असा गर्भित इशारा महायुतीतील घटकपक्षांनी एकत्र येत भाजपला दिला. संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात घटकपक्षांनी एका मंचावर येत नेम साधल्यामुळे येत्या काळात भाजपची चिंता व डोकेदुखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा १२ वा वर्धापन दिन देशपांडे सभागृहात साजरा करण्यात आला. उद््घाटन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, रिपाइं (आ.) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे संयोजक आ. विनायक मेटे यांनी एका मंचावर येत एका सुरात भाजपला दम भरला. येत्या काळात मित्रपक्षांची एकजूट अधिक घट्ट करीत यापुढे भाजपला साकडे न घालता आपापला पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. रिपाइंचे महासचिव राजेंद्र गवई, रासपचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, आ. राहुल कुल, वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर या वेळी उपस्थित होते.या वेळी खा. आठवले म्हणाले, मंत्रिपदे द्यायची असेल तर द्या, नाही तर काय करायचे ते आम्ही ठरवू. महायुतीत भाजपने रिपाइंला आठ जागा दिल्या. मात्र, या सर्व जागांवर शिवसेना विजयी झाली. भाजपने आमच्या उमेदवारांना मते न दिल्यामुळेच पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला.
खा. राजू शेट्टी म्हणाले, आपण केलेल्या दुष्काळी भागाच्या दौर्‍यात अच्छे दिन आले असे म्हणणारा एकही माणूस भेटला नाही. आम्हाला लाल दिव्यातून फिरायची हौस नाही पण त्यातून सामान्य माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे. घटकपक्षांमुळे सत्ता आली हे कुणीही विसरू नये. भाजपने आपल्याला आश्‍वासने देऊन फसवलं आहे. वेळ आली तर वाघनखं बाहेर काढू, अशा इशारा त्यांनी दिला.
शिवसंग्राम नेते आ. विनायक मेटे यांनी हे सरकार युतीचे आहे, महायुतीचे नाही. आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र पेटविला. पण आता सरकार आल्यावर वाट पहावी लागत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. न्याय कसला देता, सत्तेत वाटा द्या, असे भाजपला ठणकावून सांगत आपसातील विसंवाद दूर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी घटकपक्षांकडून व्यक्त केली. संचालन बाळासाहेब दोडकल्ले यांनी केले.