स्वतंत्र विदर्भाला मोदींचा विरोध नाही- गडकरी

0
11

नागपूर-स्वतंत्र विदर्भाबद्दलच्या आमच्या व केंद्रसरकारच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नसून, आम्ही या मागणीवर आजही ठाम असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते नागपुरमध्ये रविवारी आयोजित एका चर्चासत्रात बोलत होते. आम्ही पुर्वीपासूनच विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याची मागणी करत आलो आहोत, ती आजही कायम आहे आणि भविष्यातदेखील कायम राहील. स्वतंत्र विदर्भाप्रती आपली आणि मुख्यमंत्र्यांची बांधिलकी असून त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत राहणार असल्याचे गडकरींनी म्हटले. यावेळी नरेंद्र मोदींच्या ‘महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही’, या विधानाची आठवण करून दिली असता, मोदींचे ते वक्तव्य मुंबईबाबत असल्याचे स्पष्टीकरण गडकरींनी दिले. छोट्या राज्यांच्या निर्मितीला भाजपने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मागणीला मोदींचा कोणताही विरोध नसल्याचे गडकरींनी सांगितले. याशिवाय, महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधली मैत्री कायम राहावी अशी इच्छाही गडकरी यांनी बोलून दाखवली. तसेच एलबीटी महिन्याभरात बंद करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.