एकनाथ खडसे यांच्यावर हक्कभंग आणणार-माणिकराव ठाकरे

0
17

नागपूर- विदर्भ व मराठवाडा आणि खानदेशातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने अधिवेशनापूर्वी पॅकेज जाहीर करावे अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

आठ डिसेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी आज कॉंग्रेस नेत्यांची नागपुरात बैठक झाली. त्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोरडवाहू शेतकऱ्यांना 25 हजार रुपये एकरी आणि फळबागायतदारांना 50 हजार रुपये एकरी मदत जाहीर करावी, अशी मागणी केली. एक डिसेंबरपासून आंदोलनाचा बिगुल फुंकणार आहे. चार डिसेंबर रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गावे दुष्काळग्रस्त आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे दलितांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यास सरकार अपयशी ठरत आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रपती शासन असताना राज्यपालांनी आणि आता मुख्यमंत्र्यांनी दलित कुटुंबीयांची भेट घेतली नाही. यामुळे सरकारच्या संवेदना संपल्या असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. निलंबित आमदारांवर हेतुपुरस्सर कारवाई केली आहे. अजूनही काही आमदारांवर कारवाईचा बडगा उगारू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

भाजप सरकार आवाजी मताने विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्याचे म्हणत असले, तरी घटनेला अनुसरून नाही. यामुळे सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मतदानातून बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
विधानसभेत सभागृहातील ज्येष्ठ सदस्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग आणणार आहोत. सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये “लुटुपुटु‘ची लढाई सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष गोंधळात आहे. आम्ही मात्र, मतदारांनी दिलेली विरोधी पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही स्पष्ट केले. शिवसेना सत्तेत वाटा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याने विरोधकांच्या भूमिकेत कुठेही दिसत नसल्याचेही ठाकरे म्हणाले