
गोंदिया, 29 मे : राज्यसभा निवडणुकीला घेऊन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला असतानाच दुसरीकडे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे आज 29 मे रोजी गोंदियात भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते.विशेष म्हणजे खा.पटेलांनीही प्रांजळपणे आमच्या दोघांची मैत्री खूप जुनी असल्याचे सांगत आम्ही सोबत आल्याचे सांगितल्याने कार्यक्रमस्थळी एकच चर्चेला उधाण आले होते. त्यातच मंचावरच माजी आमदार राजेंद्र जैन यांची सुध्दा गडकरींनी पटेलांच्या समोरच फिरकी घेतल्याचेही बघावयास मिळाले.तर काहींनी तर पुढची 2024 लोकसभा भाईजी भाजपकडून तर लढणार नाही ना….अशा वावड्याही उठवायला सुरवात केल्याचे बघावयास मिळाले. जिल्हात आज केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 आमगाव ते गोंदिया 22 किलोमिटर सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम, किडगीपर येथे रेल्वे उडण पुल, गोंदिया शहरात गड्डाटोली येथे रेल्वे उडाण पुल आणि गोंदिया शहरात बस स्थानकापासून कटंगीपर्यंत रेल्वेवर उडाणपुल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.या कार्यक्रमात प्रफु्ल्ल पटेलांच्या उपस्थितीने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र सरकारने पैसे घेतल्याचा उल्लेख गडकरींनी करीत महाविकास आघाडीला टोमणा मारला.