अग्निपथ विरोधात युवा राष्ट्रवादीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

0
17

देवरी,दि.22- केंद्र सरकारने नुकतीच अग्निपथ योजनेची चार वर्षांसाठी घोषणा केली असून ही योजना भारतीय युवकांवर अन्याय करणारी योजना असल्यामुळे ही योजना रद्द करण्यासाठी देवरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना स्थानिक उपविभागीय अधिकारी मार्फत २० जूनला निषेध निवेदन पाठवण्यात आले आहे.

देवरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष युगेशकुमार बिसेन, शहर अध्यक्ष मुकेश खरोले, तालुका महासचिव सुजित अग्रवाल, नगरसेवक पंकज शहारे, अरविंद शेंडे, ज्ञानेश्वर रहांगडाले, हिमांशू ताराम, राहुल गुप्ता, मोंटी अंसारी, तरुण पटेल, आरती जांगळे आदी पदाधिकाऱ्यांचा या शिष्टमंडळात समावेस होता.

या निवेदनामध्ये केंद्र शासनाने आणलेली चार वर्षाची अग्निपथ योजना ही भारतातील युवकांच्या भविष्याशी खेळण्यासाठी आहे. या भारतातील तरुण युवकांना शस्त्र हाती मिळणार म्हणजे ते शस्त्र अस्त्र चालवण्यात प्राविण्य मिळवणार, हा मोठा धोका समाजापुढे निर्माण होत आहे. भारताच्या सैन्य दलाच्या आणि युवकांच्या पाठीशी धैर्याने राहण्यासाठी फक्त चार वर्षाची योजना आणून तोंडाला पाने पुसण्यापेक्षा युवकांसाठी आयुष्यभराची योजना आणून देश सुजलाम सुफलाम करावा, असे निवेदनात म्हटले आहे. सदर अग्निपथ योजना सुरु करण्याआधीच ताबडतोब रद्द करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपती यांना केली आहे.