‘होय साहेब, आम्ही आपल्यासोबतच’

0
58

भंडारा-शिवसेनेचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि त्यांना सर्मथन देणार्‍या आमदारांनी राज्यात सत्तापेच निर्माण केला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्मथनार्थ गुरुवारी भंडारा जिल्ह्यातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ‘होय साहेब, आम्ही आपल्या सोबतच’ अशी हाक देऊन घोषणा दिल्या.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धक्का देत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. त्यांनी शिवसेना आणि अपक्ष आमदारांसह सरकारला आव्हान दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनेक प्रयत्नानंतरही बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून भावनिक आवाहन करुन राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री त्यांनी वर्षा हे मुख्यमंत्री निवास सोडून मातोश्री गाठली. या सर्व राजकीय घडामोडीनंतर राज्यातील निष्ठावान शिवसैनिकांची घालमेल सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांना सर्मथन देणार्‍यांमध्ये भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सर्मथनार्थ गुरुवारी सकाळी जिल्ह्यातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले. भंडारा येथील विर्शाम भवनात एकत्र येऊन शेकडो शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय चौकापर्यंत पायी कूच केली. ‘होय साहेब, आम्ही आपल्या सोबतच, अगदी शेवटच्या श्‍वासापर्यंत.’ या व अशा अनेक घोषणा देण्यात आल्या. तसेच बंडखोर आमदारांचा निषेधही करण्यात आला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख नरेश डहारे, महिला आघाडी संघटिका रश्मी पातुरकर, रोशन कळंबे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.