पराभवाच्या भीतीने भाजपची माघार:गेल्या 2 वर्षांतील 3 पोटनिवडणुका भाजपने लढवल्या

0
38

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपने आज मुरजी पटेल यांची उमेदवारी माघारी घेतली. ही राज्याची राजकीय संस्कृती असल्याचे सांगत भाजपकडून गवगवा करण्यात आला. मात्र, दुसरीकडे गेल्या 2 वर्षांमध्ये झालेल्या विधासभेच्या 3 पोटनिवडणुकीत भाजपने दिवगंत आमदारांच्या कुटुंबीयांच्या विरोधात निवडणूक लढवल्याचे पाहायला मिळते.

गेल्या दोन वर्षांत भाजपने माघार घेतली नाही. मात्र, आता भाजपला अंधेरीतील पराभव दिसत होता. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला ताकद मिळाली असती. या कारणामुळेच भाजपने माघार घेतली, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

येथे झाल्या निवडणुका

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव भागीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली. तर देगलूर मतदासरसंघात काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले. यावेळी त्यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली. कोल्हापूर उत्तरमध्येही काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. यानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविआने प्रयत्न केले. मविआकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, भाजपकडून याही निवडणुकीत सत्यजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली.

भाजपकडून जोरदार प्रयत्न

गेल्या 3 वर्षांत झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून ही 2024 ची लिटमस टेस्ट असणार आहे, असे सांगतानाच या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली होती. गेल्या 3 वर्षांमधील पोटनिवडणुकीत भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्यात आला. मात्र, पंढरपूर वगळता दोन्ही ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. आताही अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपकडून मोठी तयारी करण्यात आल होती. मात्र, अंधेरी पूर्व मतदारसंघात असलेली मराठी मतदारांची टक्केवारी लक्षात घेत आणि राज ठाकरे, प्रताप सरनाईक आणि शरद पवारांच्या बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रस्तवामुळे भाजपने दबावाखाली हा निर्णय घेतला की काय, असा सवाल राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात विचारला जात आहे.

पोटनिवडणुकीतले मतदान

पंढरपूरमध्ये भाजप

– समाधान आवताडे (भाजप) 1,09,450 – भगीरथ भालके (राष्ट्रवादी काँग्रेस) 1,05,717

– पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा 3 हजार 733 मतांनी पराभव

देगलूरमध्ये काँग्रेस

जितेश अंतापूरकर (काँग्रेस) 1,08,840

सुभाष साबणे (भाजप) 66,907

– तब्बल 41 हजार 933 मतांनी काँग्रेसचा विजय

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस

– जयश्री जाधव (काँग्रेस) 97,332

– सत्यजीत कदम (भाजप) 78,025

– कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस विजयी

भाजपला पराभव दिसत होता…

भाजपला अंधेरीतील पराभव स्पष्ट दिसत होता. या विजयानंतर शिवसेनेला जी ताकद मिळाली असती, ती भाजपसाठी मुंबई आणि महाराष्ट्रसाठी डोकेदुखी ठरली असती, शिवसेनेला मिळणारा बुस्टर आणि ठाकरेंच्या मागे जनता आहे, हा संदेश महाराष्ट्रात जाऊ नये, यासाठी भाजपकडून माघार घेण्यासाठी वातावरण तयार करण्यात आले. असे मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केले आहे.

पराभवाच्या भीतीनेच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.सचिन सावंत म्हणाले की, भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी शिवसेना फोडण्याचे पाप आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करताना त्यांना दिलेला त्रास व मानहानी विसरता येणार नाही. यासोबतच सचिन सावंत यांनी व्हिडिओही ट्विट केला आहे.