राष्ट्रवादीच्या राज्य अधिवेशनात अजित पवारांचे टीकास्त्र:शिंदे-फडणवीस सरकारमुळेच शेतकऱ्यांची दिवाळी काळी

0
17
शिर्डी-शिंदे – फडणवीस सरकारमुळेच शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे. हे सरकार जेव्हढे दिवस सत्तेवर राहील, तेवढे राज्याचे नुकसान होणार असल्याची घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबिराला शिर्डी येथे शुक्रवारी (४ नोव्हेंबर) सुरुवात झाली. त्यात त्यांनी हे टीकास्त्र सोडले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींसह अनेक नेते उपस्थित होते. पवार म्हणाले की, फेब्रुवारी २०२३ मध्ये औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक, कोकण विभागातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहे. औरंगाबादची जागा राष्ट्रवादी, कोकणची उद्धव सेना, नाशिकची जागा काँग्रेसला आहे. नागपूर आणि अमरावतीबाबत निर्णय घेऊन पाचही जागा मविआला कशा मिळतील, याचा प्रयत्न करावा, असे अजित पवार म्हणाले.

डिसेंबर २०२२ मध्ये साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून प्रत्येकाने आपापल्या गावात अधिक बारकाईने लक्ष देऊन जास्तीत जास्त सरपंच निवडून आणा. महागाई व बेरोजगारी यासारखे मोठे संकट राज्यावर असतानाही सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातले मोठे प्रकल्प बाहेर गेले. चार लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या वेदांता प्रकल्पाबाबत स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले होते. अंगलट आल्यानंतर दिल्लीला जाऊन नवीन प्रकल्प आणायची भाषा करत आहे. यांच्यामुळे राज्यातील तरुण मुलांचे वय वाढत जात असल्याने त्यांना नोकरीपासून मुकावे लागणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

आज शरद पवारांचे मार्गदर्शन
खोकल्याच्या आजारामुळे शरद पवार पहिल्या दिवशी अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण ते शनिवारी विशेष विमानाने शिर्डीत येऊन मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी त्यांनी ब्रीच कँन्डी हॉस्पिटलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने अजित पवारांसह इतरांची भाषणे ऐकली.