राजकारणासोबत समाजकारणावरही भर द्या-पूर्णा पटेल

0
10

गोंदिया दि.04: मी राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त विश्वास ठेवते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व विंगच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात राजकारणासोबत समाजकारणाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या पूर्णा पटेल यांनी केले.पक्षाचे कोणतेही काम केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावानेच होईल. मात्र सामाजिक क्षेत्रातील अनेक कामे मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. देशात सामाजिक कार्य करणाऱ्या इतर संस्थांच्या माध्यमातूनही येणाऱ्या दिवसात गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक योजना कार्यान्वित केल्या जातील, असे पूर्णा पटेल म्हणाल्या.

शहर राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पक्षाच्या इतर घटकांमधील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पूर्णा पटेल मार्गदर्शन करीत होत्या. आ.राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पटेल यांच्या रामनगर बगिचा या बंगल्यात गुरूवारी बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पूर्णा म्हणाल्या राजकारण महत्वाचे आहेच, पण त्यासोबत समाजाशी जुळून राहण्यासाठी समाजकारणही केले पाहीजे. या निमित्ताने सामान्य नागरिकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. आज युवा शक्ती ही समाजाची ताकद आहे. त्या शक्तीला नवी दिशा देऊन योग्य प्रवाहात जोडण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीच्या काळात जे युवा कार्यकर्ते आपल्यासोबत जुळले होते ते आजही आपल्या सोबत आहेत हे पाहून आनंद होतो. त्यांच्या माझ्यावर जो विश्वास होता तो कायम असल्याचे यातून दिसून येते. आपले नेते खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनातच आपल्याला काम करायचे असल्याचे पूर्णा पटेल म्हणाल्या.

आ.राजेंद्र जैन म्हणाले, विद्यमान सरकार केवळ घोषणा करीत असून शेतकरी आणि युवा वर्गासाठी काहीच करीत नसल्याने बेरोजगारीत वाढ झाली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या कृषीमालाला योग्य भाव नसल्यामुळे हताश होऊन शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात पुढे येऊन सरकारवर दबाव बनविण्यासोबतच नागरिकांना जागरूक करण्याचे काम करावे, असे आवाहन आ.जैन यांनी केले.

जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, तालुका पर्यवेक्षक अशोक गुप्ता, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जिल्हा युवक अध्यक्ष किशोर तरोणे, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर आदींनी मार्गदर्शन केले. संचालन प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे यांनी तर आभार शहर विद्यार्थी अध्यक्ष करण गील यांनी मानले. यावेळी गंगाधर परशुरामकर, अशोक सहारे, सुरज गुप्ता, निखील जैन, शहर युवक अध्यक्ष प्रतिक भालेराव, विनायक शर्मा, सुशिला भालेराव, सतीश देशमुख, रवी मुंदडा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.