नागपूरमध्ये काँग्रेसचा अडबाले यांना पाठिंबा

0
18

नागपूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूरच्या शिक्षक मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटलेल्या या जागेवर काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान शिवसेनचे (ठाकरे गट) गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांचा अर्ज कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात आता भाजप समर्थित नागोराव गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर आडबाले हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांनी मात्र अर्ज कायम ठेवला. त्यामुळे इटकेलवार यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे शहर अध्यक्ष इश्वर बाळबुधे यांनी सांगितले.

अडबाले की झाडे यापैकी कोणला पाठिंबा द्यावा याबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत होत नव्हते. यंग टिचर्स असोसिएशनसह माजीमंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबोले यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. तर विधानपरिषदेचे सदस्य अभिजित वंजारी यांचा आग्रह शिक्षक भारतीच्या राजेंद्र झाडे यांच्यासाठी होता. अखेर अडबाले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने जाहीर केल्याने तिढा सुटला.

 काँग्रेसने नेमलेली समन्वय समिती- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने नेमलेल्या ४९ सदस्यीय केंद्रीय समन्वय समितीचे बबनराव तायवाडे हे या समितीचे मुख्य समन्वयक होते.या समिती मध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार,माजी मंत्री सतीश चतुर्वेदी,नितीन राऊत,विजय वडेट्टीवार,सुनील केदार,रणजित कांबळे,राजेंद्र मुळक अशा सात माजी मंत्र्यांचा समावेश होता.पक्षाचे खासदार बाळू धानोरकर यांच्यासह आमदार सुभाष धोटे,विकास ठाकरे,अभिजित वंजारी,राजू पारवे,प्रतिभा धानोरकर,सहराम करोटे या आमदारांचाही समावेश होता.प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे,चारुलता टोकस,किशोर गजभिये यांच्या सह प्रदेश पदाधिकाऱ्यांचा समावेश करीत जबाबदारी सोपविण्यात आली.मात्र एक उमेदवार हे काँग्रेसकरीता शोधू शकले नाही हेच या नेत्यांचे राजकिय अपयश ठरले आहे.