लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ५१ कोटी खर्च!

0
11

वृत्तसंस्था
नवी दिल्ली-निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५१ कोटी तर बहुजन समाज पक्षाने तब्बल ३० कोटींची उधळण केल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील सहा राष्ट्रीय पक्षांच्या निवडणूक खर्चाची पडताळणी केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. मात्र, भाजप आणि काँग्रेस या प्रमुख राष्ट्रीय पक्षांकडून आयोगाला अद्यापपर्यंत निवडणूक खर्चाचा तपशील सादर न करण्यात आल्यामुळे दोन्ही पक्षांच्या खर्चाचा आकडा गुलदस्त्यातच राहिला आहे. २०१४ लोकसभा आणि आंध्रप्रदेश, अरूणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांतील विधानसभा खर्चाचा तपशील या दोन्ही पक्षांकडून येणे बाकी आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडे सध्या असलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी देशभरात सर्वाधिक खर्च करणारा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीने यंदाच्या निवडणुकीत ५१,३४,४४,८५४ रूपये खर्च केले असून, त्याखालोखाल बसपने ३०,०५,८४,८२२ रूपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १८,६९,१८,१६९ रुपये खर्च केला आहे. यापूर्वी २८ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडून खर्चाचा तपशील सादर न केल्याबद्दल काँग्रेस, भाजप, आप यांच्यासह २० राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. खर्चाचा तपशील सादर न केल्यास या पक्षांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही आयोगातर्फे देण्यात आला होता. सध्याच्या नियमांनुसार राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकांपासून ७५ दिवस, तर लोकसभा निवडणुकांपासून ९० दिवसांच्या आतमध्ये निवडणूक खर्चाचा तपशील आयोगाकडे जमा करणे बंधनकारक आहे.