‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीचे सूप वाजले:14 सदस्यीय समन्वय समिती स्थापन

0
13

मुंबई-मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक झाली. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी 1 सप्टेंबर रोजी 3.30 वा. या आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या देशभर रॅली काढण्यात येईल. आम्ही जुडेगा भारत, जीतेगा इंडिया थीम निश्चित केली आहे. आम्ही समन्वय समितीही स्थापन केली आहे.

कोण काय म्हणाले?

उद्धव ठाकरे

  • आगामी निवडणुकीत आम्ही हुकूमशाही-जुमलेबाजीविरोधात विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे.
  • आम्ही सबका साथ, सबका विकास असे ऐकले होते. पण निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची मित्रमंडळी वाढली आणि त्यांचाच विकास झाला.
  • आमच्या एकजुटीमुळे सत्ताधाऱ्यांत घबराट पसरली आहे. आम्ही क्रोनिझमच्या विरोधात लढू. घाबरू नका, आम्ही भयमुक्त भारत घडवणार आहोत.
  • अखेर सरकारने अचानक संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले?

लालूप्रसाद यादव (बिहारचे माजी मुख्यमंत्री)

  • मला खूप आनंद झाला की आपण सर्वजण एकत्र बसलो आहोत. या देशातील विविध पक्षांचे नेते आतापर्यंत एकत्र नव्हते. त्याचे परिणाम देशाला भोगावे लागले आणि त्याचा फायदा मोदींनी घेतला.
  • आम्ही सातत्याने लढाई लढून या टप्प्यावर येऊन एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. आता एक पॅटर्न तयार झाला आहे.
  • भाजपला हटवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून ही लढाई लढत राहिलो. देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत.
  • महागाई, बेरोजगारी वाढत आहे. भेंडी 60 रुपये किलो झाली, टोमॅटो किती महाग झाले.
  • हे लोक किती खोटे बोलून सत्तेत आलेत हे तुम्हाला आठवत असेल.
  • माझा पैसा स्विस बँकेत जमा असल्याची अफवा या लोकांनी पसरवली होती. आम्ही परदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याची वल्गना या लोकांनी केली होती. पण नंतर ही केवळ धुळफेक असल्याचे स्पष्ट झाले. आम्ही पती-पत्नी, मुलांना मिळून 11 जण होतो. आता त्याला 15 ने गुणून किती होतात हे सांगा. आम्हाला एक पैसाही मिळाला नाही. हा सर्व पैसा याच लोकांचा होता.
  • देशातील शास्त्रज्ञांनी या लोकांना चंद्रलोकाऐवजी सूर्यलोकात पाठवावे, असे आवाहन आम्ही इस्रोच्या शास्त्रज्ञांना करत आहोत.
  • आम्ही मोदींना हटवूनच दम घेण्याचा संकल्प केला आहे.

नितीश कुमार (बिहारचे मुख्यमंत्री)

  • एकदा त्यांना (पीएम मोदी) मुक्ती मिळाली की, तुम्हा पत्रकारांनाही स्वातंत्र्य मिळेल. त्यानंतर तुम्हाला वाटेल ते लिहा.
  • सध्या दिसून येत आहे की, ते कोणतेच काम करत नाहीत. पण त्यांचा उदोउदो करणाऱ्या बातम्या येत आहेत.
  • त्यांची देशाचा इतिहास बदलण्याची इ्चछा आहे. आम्ही असे होऊ देणार नाही.
  • आम्ही सर्वांचा उत्थान करणार, कुणाशीही भेदभाव करणार नाही. सर्वांना पुढे घेऊन जाणार.
  • ते कोणत्याही क्षणी निवडणूक घेतील हे लक्षात घ्या. आम्हीही त्याची चर्चा केली आहे. तशी तयारीही सुरू केली आहे.

अरविंद केजरीवाल (दिल्लीचे मुख्यमंत्री)

  • आमची इंडिया आघाडी काही 26-27 पक्षाची आघाडी नाही. ही देशातील 140 कोटी लोकांची आघाडी आहे.
  • देशातील मोदी सरकार अत्यंत भ्रष्ट व अहंकारी सरकार आहे.
  • एक व्यक्ती (गौतम अदानी) परदेशात पैसे घेऊन जात असून, त्याला पंतप्रधान मोदी मदत करत आहेत. हे सर्वकाही परदेशी वृत्तपत्रांत छापून येत आहे.
  • संपूर्ण सरकार एका व्यक्तीसाठी काम करत आहे. हे लोक (मोदी सरकार) स्वतःला देवाहून मोठे समजत आहेत.
  • इंडिया आघाडीची ताकद पाहून हे लोक आता एकमेकांशी संघर्ष करतील. पण आमच्यात सर्वकाही चांगले सुरू आहे. येथे पदासाठी कुणीही एकत्र आले नाही. सर्वांनी पुढे येऊन जबाबदारी घेतली आहे. कुणी जागा वाटप, कुणी मीडिया मॅनेजमेंट, कुणी सोशल मीडियाची जबाबदारी घेतली आहे.

राहुल गांधी (वायनाडचे काँग्रेस खासदार)

  • व्यासपीठावरील लोक देशाच्या 60% जनतेचे प्रतिनिधित्व करतात.
  • आम्ही एकजूट होऊन निवडणूक लढली, तर भाजपचा विजय होऊच शकत नाही. आमची आघाडी भाजपचा अत्यंत सहजपणे पराभव करेल असे मला वाटते. विकासात गरीब व शेतकऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची गरज आहे. भाजप गरिबांचा पैसा हिसकावून काही मोजक्या धनदांडग्यांना देते.
  • आता जागा वाटपावर चर्चा होईल.
  • एक उद्योगपती व पंतप्रधान मोदींत संगनमत आहे. मोदी व अदानींतील संबंधांवर मी कालच भाष्य केले. एक अब्ज डॉलर्स देशातून बाहेर गेले आणि परत आले. मोदी जी-20 ची बैठक घेत आहेत. त्यांनी या पैशाची चौकशी केली पाहिजे.
  • बैठकीत 2 महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या. एक-समन्वय समिती स्थापन करणे. दोन-जागा वाटपावर प्रस्ताव पारित करू.
  • आम्ही एक समिती स्थापन करत आहोत जी धोरणांवर चर्चा करेल. ही समिती देशातील शेतकरी आणि गरीबांसाठी आमचे व्हिजन जनतेपुढे सादर करेल.

मुंबईतील तिसऱ्या बैठकीचे सूप वाजले

मुंबईत इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट आघाडीच्या (I.N.D.I.A.) मुंबईतील तिसऱ्या बैठकीचे शुक्रवारी सूप वाजले. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये या बैठकीसाठी जवळपास सर्वच प्रमुख विरोधी पक्षांचे बडे नेते जमले होते. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आदींचा समावेश होता.

इंडिया आघाडीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी या आघाडीने जागा वाटपाच्या मुद्यावर आपली 14 सदस्यीय समन्वय समिती स्थापन केली. यात समितीत महाराष्ट्रातील शरद पवार व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना स्थान देण्यात आले आहे.

याशिवाय या समितीत काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, द्रमुकचे एम के स्टॅलीन, राजदचे तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चढ्ढा, सपचे जावेद अली खान, जदयुचे लल्लन सिंह, झामुमोचे हेमंत सोरेन, सीपीआयचे डी राजा, नॅशनल कॉन्फरंसचे ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती व CPI (M) च्या एका सदस्याचा समावेश आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे इंडियाच्या या बैठकीत आघाडीच्या लोगोवर मतैक्य होऊ शकले नाही. त्यामुळे त्याचे अनावरण करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. या प्रकरणी 6 लोगो डिझाईन व शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. त्यापैकी 1 सर्वांना आवडला. पण त्यात काही सुधारणा करणे आवश्यक आहे. याबाबतचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार आहे.

इंडिया आघाडीची ही महत्त्वकांक्षी बैठक हॉटेल ग्रँड हयात येथे झाली. बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, इंडिया आघाडी मजबूत होत जाईल, तसे तिच्या सदस्यांवर छापे वाढतील. तसेच नेत्यांना अटक होण्याचे प्रमाणही वाढेल. 31 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीच्या पहिल्या दिवशी 28 पक्षांचे नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी देश व संविधान वाचवण्यासाठी एकत्र आल्याचा दावा केला आहे.

समितीत 2 CM, 1 उपमुख्यमंत्री

विरोधकांच्या आघाडीच्या 13 सदस्यीय समितीत 2 मुख्यमंत्र्यांना स्थान मिळाले आहे. यात तामिळनाडूचे CM एमके स्टॅलिन व झारखंडचे CM हेमंत सोरेन यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचाही यात समावेश आहे. ओमर अब्दुल्ला (NC) व मेहबुबा मुफ्ती (PDP) या 2 माजी मुख्यमंत्र्यांनाही यात स्थान देण्यात आले आहे. केसी वेणुगोपाल (काँग्रेस), संजय राऊत (शिवसेना यूबीटी), शरद पवार (राष्ट्रवादी), राघव चढ्ढा (आप) व जावेद अली खान (एसपी) हे 5 राज्यसभा खासदार आहेत. याशिवाय 2 लोकसभा खासदार लल्लन सिंह (जदयु), अभिषेक बॅनर्जी (टीएमसी) यांनाही समितीच्य सदस्यपदी स्थान देण्यात आले आहे. या समितीमधील डी राजा (CPI) हे एकमेव सदस्य आहेत जे लोकसभेत किंवा राज्यसभेचे सदस्य नाहीत.

I.N.D.I.A. च्या तिसऱ्या बैठकीत महत्त्वपूर्ण प्रस्ताव पास

  • आम्ही I.N.D.I.A. च्या सदस्यांनी लोकसभा निवडणूक शक्य असेल तिथे एकत्र लढवण्याचा संकल्प घेतला.
  • राज्यांमध्ये जागा वाटपाची व्यवस्था लगेच सुरू होईल आणि ती व्यवहार्य भावनेने लवकरच संपुष्टात येईल.
  • आम्ही I.N.D.I.A. च्या सदस्यांनी सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशभरात सार्वजनिक रॅली काढण्याचा संकल्प केला.
  • आम्ही I.N.D.I.A. च्या सदस्यांनी अनेक भाषांत ‘जुडेगा इंडिया, जीतेगा इंडिया’ या थीमसह आमची रणनीती आणि मोहिमा समन्वयित करण्याचा संकल्प केला.

पाहा आजच्या बैठकीचे फोटो…

इंडियाची बैठक संपुष्टात आल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिल्लीच्या दिशेने प्रयान केले.
इंडियाची बैठक संपुष्टात आल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिल्लीच्या दिशेने प्रयान केले.
बैठकसुरू होण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन करण्यात आले. या बैठकीला 6 मुख्यमंत्री व 23 पक्षांचे 63 नेते हजर आहेत.
बैठकसुरू होण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन करण्यात आले. या बैठकीला 6 मुख्यमंत्री व 23 पक्षांचे 63 नेते हजर आहेत.
बैठकीसाठी जाताना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार.
बैठकीसाठी जाताना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार.
बैठकीत उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधी.
बैठकीत उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधी.
बैठकीला उपस्थित अरविंद केजरीवाल, लालुप्रसाद यादव, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, प्रकाश करात.
बैठकीला उपस्थित अरविंद केजरीवाल, लालुप्रसाद यादव, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, प्रकाश करात.
प्रकाश करात व राहुल गांधी चर्चा करताना.
प्रकाश करात व राहुल गांधी चर्चा करताना.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती व बाजुला कपिल सिब्बलही दिसत आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती व बाजुला कपिल सिब्बलही दिसत आहेत.
आदित्य ठाकरे, जंयत पाटील, सुप्रिया सुळे, संजय राऊतदेखील बैठकीला उपस्थित आहेत.
आदित्य ठाकरे, जंयत पाटील, सुप्रिया सुळे, संजय राऊतदेखील बैठकीला उपस्थित आहेत.

बैठकीसाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

  • इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे, अशी महत्त्वाची माहिती आज राज्याचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. वडेट्टीवार यांनी सांगितले की, लोगोबाबत आमचा विचार सुरू आहे. लोगोबाबत सर्व नेत्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लवकरच त्यानुसार निर्णय होईल. आज होणारे लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे. आज संयोजक व जागावाटपासाठी समिती ठरवली जाईल. तसेच, इंडिया आघाडीची पुढील बैठक तामिळनाडूला होईल.
  • काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आहेत. मुंबईतील ग्रॅन्ड ह्यात हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. मात्र, आज सकाळीच राहुल गांधी हॉटेलमधून बाहेर पडले. ते अचानक हॉटेलमधून गायब झाल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

तिरंग्याच्या रंगात लोगो?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडिया आघाडीचा लोगो हा तिरंग्याच्या रंगात रंगवण्याचा विचार केला जात आहे. यात I.N.D.I.A चे IN भगव्या रंगाचे, D पांढर्‍या रंगाचे आणि IA हिरव्या रंगाचे असू शकते. इंडिया आघाडीच्या बैठकीत याला मंजुरी मिळाल्यानंतर आज लोगो प्रसिद्ध होणार आहे.

जागावाटपावर चर्चा

दरम्यान, देशात मुदतपूर्व निवडणूकीची शक्यता वर्तवली जात आहे. यापार्श्वभूमीवर जागावाटपाच्या सूत्रावर आघाडीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी प्रादेशिक पातळीवर समित्या स्थापन करण्याचीही चर्चा आहे. 31 ऑगस्ट रोजी पहिल्या दिवशीच्या बैठकीला 28 पक्षांचे नेते उपस्थित होते. देश आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र आल्याचे यावेळी नेते म्हणाले होते. भाजपला सामोरे जाण्यासाठी विरोधकांकडून सामाईक कार्यक्रम तयार केला जाणार आहे.

पहिल्या दिवशी कोण काय म्हणाले?
लालू प्रसाद यादव (आरजेडी) 
: देशाची एकता आणि सार्वभौमत्व टिकवण्याची गरज आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवायची आहे. गरिबी, बेरोजगारी आणि शेतकरी हिताच्या प्रश्नांवर मोदी सरकार अपयशी ठरत आहे. त्यासाठी आम्ही सर्वांना मान्य होईल असा एक कार्यक्रम तयार करत आहोत.

तेजस्वी यादव (RJD): गेल्या वर्षी लालू यादव आणि नितीश कुमार यांनी समविचारी विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे काम केले. आता वर्षभरानंतर विरोधी पक्ष भारत आघाडीची तिसरी बैठक होत आहे. जर आपण लोकांची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर लोक माफ करणार नाहीत.

मेहबूबा मुफ्ती (पीडीपी): जवाहरलाल नेहरूंपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत नेत्यांनी देशाला आणि तरुणांना दिशा दिली. JNU, ​​IIM आणि ISRO सारख्या संस्था निर्माण केल्या.

राघव चढ्ढा (आप): भाजपला इंडिया आघाडीची भीती वाटते. ते इंडिया या शब्दाचा द्वेष करत आहेत आणि त्याचा संबंध दहशतवादी संघटनांशी जोडत आहेत. कदाचित एनडीए यशस्वी होणार नाही, अशी भीतीही त्यांना आहे.

आदित्य ठाकरे (शिवसेना, उद्धव गट) : संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत.

सीताराम येचुरी (सीपीएम): इंडिया आघाडीला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपला भीती वाटत आहे.

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट): मोदी सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा इंडिया आघाडीला सामना करावा लागणार आहे. त्यामुळे देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. भाजपला इंडिया या आमच्या नावाचीही अडचण आहे, याचा अर्थ आम्ही योग्य दिशेने आहोत.

पहिल्या दिवशी बैठकीला उपस्थित नेते.
पहिल्या दिवशी बैठकीला उपस्थित नेते.