डॉ.आंबेडकर,जिचकारांना पराभूत करणार्या भंडारा लोकसभा मतदारसंघात जातीय राजकारण वरचढ

0
25

गोंदिया(खेमेंद्र कटरे)-देशाच्या राजकीय पटलावर भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र नेहमीच चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघातील निवडणूक जातीय समीकरणावर लढली गेल्याने अनेक मातब्बरांना पराभव स्वीकारावा लागला. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर,उच्च विद्याविभूषित डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यासारख्या उमेदवारांना येथील मतदारांनी नाकारले. राष्ट्रीय राजकारणात वजन असलेले आणि या मतदारसंघातून ६ वेळा निवडणुक लढवून चारदा विजयी झालेले प्रफल्ल पटेल यांनाही पराभव दाखविला. तर निवडून येणारच नाही असे सांगण्यात येणार्या विद्यमान खासदार सुनिल मेंढे यांना मात्र मोदी लाटेत लोकसभेत पोचता आले.एकूणच या मतदारसंघाचा कौल कुणाच्या पारड्यात जाईल, हे तत्कालीन परिस्थितीच ठरवित असते.त्यातच कुुणबी-पोवार यांच्यात या मतदारसंंघावर वर्चस्व निर्माण करण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे.

१९५२ च्या पहिल्या निवडणुकीत भंडारा मतदारसंघात खुल्या प्रवर्गातून एक आणि राखीव प्रवर्गातून एक असे दोन खासदार लोकसभेत गेले. यातील एका खासदाराचे निधन तर दुसरे न्यायालयात अपात्र ठरल्याने १९५४ पोटनिवडणूक घेण्यात आली. १९६२ पर्यंत दोन खासदारांची परंपरा कायम राहिली. मतदारसंघ पुनर्रचनेत बदल करून एकच खासदार लोकसभेत पाठविला जाऊ लागला. २००९मध्ये पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि भंडारा-गोंदिया असा मतदारसंघ अस्तित्वात आला. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर साकोली व गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व अर्जुनी-मोरगाव असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघ हा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गेला आहे.
भंडारा लोकसभा मतदारसंघ १९५२पासूनच कॉंग्रेसचा गड राहिला आहे. त्याकाळी दोन प्रतिनिधी निवडून देण्याची पद्धत असल्याने काँग्रेसचे तुलाराम चंद्रभान साखरे व चतुर्भूज विठ्ठलदास जसानी निवडून गेले. त्यानंतर १९५४ मध्ये झालेली पोटनिवडणूक देशभर चर्चिल्या गेली. कारण या पोटनिवडणुकीत खुद्द राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिंगणात होते. परंतु, या निवडणुकीत त्यांचा कॉंग्रेसचे भाऊराव बोरकर यांनी ८३८१ मतांनी पराभव केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे वडील काँग्रेस नेते मनोहर पटेल यांनी बाबासाहेबांच्या विरोधात कटकारस्थान केल्यामुळे आणि एका पोटजातीच्या मतदारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मतदान करण्याऐवजी आपल्या पोटजातीचा उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या भाऊराव बोरकर यास मतदान केल्यामुळे बाबासाहेबांना पराभवाचा सामना करावा लागला असे सांगितले जाते.

या निवडणुकीत बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी स्थानिक काँग्रेसने तसेच अशोक मेहता यांच्या प्रजा समाजवादी पार्टी ने दगाफटका केला.याच पोटनिवडणुकीत अशोक मेहता १७,१५३ मतांनी निवडून आले. जेव्हा की प्रजा समाजवादी पार्टी व शेड्युल कॉस्ट फे़डरेशनमध्ये समन्वय असतांनाही बाबासाहेबांना प्रजा समाजवादी पार्टीची मते मिळाली नाही.
१९५७ च्या निवडणुकीत रामचंद्र मार्तंड हजरनवीस व आरक्षित जागेवर बालकृष्ण वासनिक निवडून आले होते. १९६२ मध्ये पुन्हा रामचंद्र हजरनवीस विजयी झाले. १९६७ च्या निवडणुकीत अशोक मेहता, १९७१ मध्ये काँग्रेसचे विश्वंभरदास दुबे विजयी झाले.
१९७७ च्या निवडणूकीत जनता पार्टीकडून लक्ष्मणराव मानकर विजयी झाले.१९८० व १९८४ मध्ये काँग्रेसचे केशवराव पारधी यांनी विजय मिळविला.त्ङ्मानंतर जनता पार्टी ही भारतीङ्म जनता पार्टी म्हणून नावारुपास आली व १९८९ मध्ये भाजपचे डॉ. खुशाल बोपचे हे विजयी झाले. त्यानंतर १९९१, १९९६ व १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर प्रफुल्ल पटेल हे सलग तिनवेळा विजयी झाले.
१९९९ मध्ये भाजपचे चुन्नीलाल ठाकूर विजयी झाले. २००४ च्या निवडणुकीत भाजपचे शिशुपाल पटले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा तीन हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत प्रफुल पटेल यांनी भाजपचे शिशुपाल पटले यांचा पराभव केला.२०१४च्या निवडणुकीत भाजपचे नाना पटोले यानी राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांचा पराभव केला.२०१८ ‘मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांचा पराभव केला.तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सुनिल मेंढे यांनी नाना पंचबुुध्दे यांचा पराभव केला होता.
राष्ट्रीय राजकारणात प्रफुल पटेल यांचा दबदबा कायम असतानाही २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपच्या नाना पटोले यांच्याकडून प्रफुल पटेलांना पराभव स्वीकारावा लागला. नाना पटोले खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर काही दिवसातच त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे वळले. दरम्यान त्यांनी राजीनामा दिल्यानंतर २०१८ मध्ये पोटनिवडणूक झाली. सर्वत्र भाजपमय वातावरण असताना या पोटनिवडणुकीत नाना पटोले हे काँग्रेसमध्ये दाखल झाले व त्यांनी आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांच्या विजयाकरीता आपल्या हाती धुरा घेतली.त्या निवडणुकीत भाजपचे हेमत पटले यांचा मधुकर कुकडे यांनी 50 हजार मतांनी पराभव केला.आणि या मतदारसंघावर एकेकाळी राहिलेले पोवार समाजाचे वर्चस्व सकल कुणबी समाजाच्या एकीकरणामुळे व पटोलेंच्या नेतृत्वातील गणितामुळे बिघडले गेले.
पटोलेनंतर नंतर २०१४,१०१८ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कुणबी समाजाच्या उमेदवारांने विजय मिळवित या जागेवर सर्वच राजकीय पक्षात आपले स्थान पक्के केले. या मतदारसंघात उमेदवार कितीही मातब्बर असला तरी जातीच्या आधारावर येथील निवडणुका होत असतात, हेच या मतदारसंघाने दाखवून दिले आहे.पोवार,कुणबी समाजाव्यतिरिक्त तेली समाजाचे ही मोठी संख्या असून आजपर्यंत या समाजाला एकदाही कुठल्याच राजकीय पक्षाने संधी न दिल्याने यावेळी २०२४ मध्ये ब्रम्हनंद कुरंजेकर यांनी उमेदवारीकरीता दंड थोपाटले आहे.
२०२४च्या निवडणुकीसाठी जातीच्या आधारावर सर्वच पक्षात उमेदवारांचा शोध सुरू आहे.भाजपच्यावतीने कुणबी,पोवार समाजाच्या उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे.तर काँग्रेस मविआतर्फे एकमेव नाना पटोलेंच्या नावाची चर्चा सुरु आहे.त्यातच या मतदारसंंघात कुणबी समाज सर्वाधिक असून यात खेडुले,झाडे,बावणे व तिरेले कुणबी यांचा समावेश असून तिरेले कुणबी समाजाची संख्या मतदारसंघात खूपच कमी आहे.राजकारणात झाडे व खेडुले कुणबी समाजातील नेत्यांचे राजकीय वजन सर्वाधिक दिसून येत असले तरी यावेळी मात्र तिरेळे कुणबी समाजातून उमेदवार भाजपच्यावतीने राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


गडातूनच ‘पंजा‘ गायब
१९७५मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला. जनसंघाचे लक्ष्मणराव मानकर हे पहिले गैरकाँग्रेसी खासदार निवडून आले. त्यावेळी मानकर यांनी राज्यात मंत्री असलेले काँग्रेसचे छेदीलाल गुप्ता यांना मात दिली होती. १९८० व १९८४ मध्ये पुन्हा काँग्रेसने केशवराव पारधी यांच्या रुपाने या मतदारसंघावर कब्जा मिळविला. पोवार समाजाला संसदेत जागा मिळवून दिली. १९८९मध्ये भंडारा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला ही जागा डॉ.खुशाल बोपचे यांनी मिळवून दिली. दोन वर्षातच १९९१ मध्ये पुन्हा मध्यावधी झाल्या. या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली.त्यांनी भाजपचे डॉ. खुशाल बोपचे यांचा १ लाख ६३ हजार ५५८ मतांनी पराभव केला.नंतर १९९६, १९९८ मध्येही विजयी परंपरा कायम राखली.
१९९६ च्या निवडणुकीत प्रफुल पटेल यांनी भाजपचे राम आस्वले यांचा ६ हजार ९६३ मतांनी पराभव केला.१९९८ मध्ये पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकीत प्रफुल पटेल यांनी भाजपचे नारायणदास सराफ यांचा १९ हजार ३०६ मतांनी पराभव केला.राजीव गांधी यांची हत्या झाली नसती तर त्यावेळी पटेलांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असते, अशी परिस्थिती होती.उद्योगपती राहिलेल्या सराफांना मात्र पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्करावा लागला त्यानंतर त्यांनी दुसरी कुठली निवडणुकच बघितली नाही.
१९९९मध्ये काँग्रेसचे डॉ. श्रीकांत जिचकार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा भाजपचे चुन्नीलाल ठाकूर यांनी ३ हजार ८१९ मतांनी पराभव केला. २००४मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करून भंडारा लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून या मतदारसंघातून काँग्रेसचा पंजा लोकसभा निवडणुकीतून गायब झाला. आजही पंजा आपले अस्तित्व शोधत आहे,ते केवळ पटेल यांच्यामुळेच.
२००४ च्या निवडणुकीत भाजपचे शिशुपाल पटले यांनी प्रफुल पटेल यांचा ३ हजार ९ मतांनी पराभव केला होता. वास्तविक भाजपने नवखा उमेदवार म्हणूनच शिशुपाल पटलेंना उमेदवारी दिली होती. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपने शिशुपाल पटले यांना उमेदवारी दिली. परंतु, काँग्रेसचे बंडखोर नाना पटोले यांनी दुसèया क्रमांकाची मते घेतल्याने भाजपच्या शिशुपाल पटलेंची अनामत रक्कम जप्त झाली.विशेष म्हणजे पोवार समाज बहुसंख्य असतानाही पटले यांची जमानत वाचू शकली नाही,यावरुन कुणबी समाज जसा विविध पक्षात असला तरी तो वेळेवर संंघटित होतो मात्र त्यांच्यासारखा पोवार समाज हा संघटित होत नाही,हे शिशुपाल पटले व हेमंत पटले यांच्या निवडणुकीतील पराभवातून बघावयास मिळते.पोवार समाज हा पक्षाने कट्टर बांधलेला दिसून येत आहे.
यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी छुप्या पध्दतीने पटेल व पटोलेंचा काम केला होता.काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारामुळे पुन्हा प्रफुल पटेल यांचा २ लाख मतांनी विजय झाला.तर २०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून नाना पटोले रिंगणात राहिल्याने प्रफुल पटेलांना अडीचलाखाहून अधिक मतांनी पराभवाचा स्वाद चाखावा लागला होता.या निवडणुकीत कुणबी समाजासह इतर समाजाने पटोलेंच्या बाजुने कौल दिला.
त्यानंतर २०१८ मध्ये नाना पटोलेंनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे मे २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राँकाकडून मधुकर कुकडे हे रिंगणात राहिले त्यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा ५० हजाराने पराभव केला. यानिवडणुकीत दुसèयांदा कुणबी समाजाने आपल्या एकतेचा व शक्तीचा परिचय करुन देत कुकडे ङ्मांना लोकसभेत पोचवले.त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीक भारतीय जनता पक्षाच्यावतीने आरएससचे कार्यकर्ते  व व्यवसायाने कंत्राटदार असलेल्याा सुनिल मेंढे यांना उमेदवारी दिली.त्यावेळी सुध्दा भाजपमध्ये उमेदवारीकरीता चागलीच चुरस निर्माण झाली होती.२०१९ मध्ये सुुध्दा बाहेरचा नको जी भूमिका होती तीच भूमिका भाजपमध्ये २०२४ च्या निवडणुकीतही दिसून येत आहे.१९ च्या लोकसभा निवडणुकीत मेढे यांनी मोदी लाटेत प्रचंड मंंतानी विज प्राप्त करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना पंचबुध्दे यांचा पराभव केला होता.गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास बहुजन समाज पक्षाचा उमेदवार हा ५० हजाराच्यावर मतदान घेऊन आपली तिसरी ताकद निर्माण करण्यात यशस्वी झाला असला तरी मतदारसंघात पाहिजे तसे यश बसप मिळवू शकले नाही,याउलट कुठल्या एका उमेदवाराच्या पराभवाकरीता प्रभावी ठरले आहेत.आता २०२४ च्या निवडणुकीत कोण कुुठल्या पक्षाचा उमेदवार राहतो यावरच सर्वांचे लक्ष लागले आहे.

-: गाजलेल्या निवडणुका :-
्र१९५४ झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव भाऊराव बोरकर यांनी केला. झाला.
्र१९९९मध्ये डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा या मतदारसंघाकडे राजकीय धुरीणांच्या नजरा खिळल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उदयास आला होता. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले. परंतु, त्यांनी निवडणूक न लढता जगदीश निंबार्ते यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. भाजपकडून चुन्नीलाल ठाकूर तर काँग्रेसकडून डॉ. श्रीकांत जिचकार रिंगणात होते. या अटीतटीच्या लढतीत भाजपचे चुन्नीलाल ठाकूर यांनी विजय
मिळविला. डॉ. जिचकार यांचा ३ हजार ८०० मतांनी पराभव झाला. प्रतिभावान व्यक्तिमत्व म्हणून डॉ. जिचकार यांची ओळख असताना त्यांनाही येथील मतदारांनी नाकारले होते.याकरीता काही तत्त्कालीन राजकीय घडामोडी सुुध्दा तेवढ्याच महत्वाच्या  ठरल्या होत्या.मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन ठाकूर जिचकार लढाईला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांनी केले हे विसरता येणार नाही.या निवडणुकीच्यावेळी प्रफुल पटेल हे चिमूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उभे असतांना जिचकार जर जिंकले तर पटेलांच्या राजकीय वर्चस्वाला या मतदारसंघात खरा धक्का लागणार होता.
्रनाना पटोले यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी मे २०१८मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर कुकडे यांनी नाना पटोलेंच्या बळावर भाजपचे हेमंत पटले यांचा पराभव केला.