पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते- नाना पटोले

0
9

गोंदिया : राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांना विमान घोटाळा प्रकरणी सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना दिलासा मिळाला आहे. सीबीआयने दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात या याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल पटेल यांना टोला लावला असून ते वाशिंग मशीन मध्ये गेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे जे व्हायचं ते होणारच होतं असं म्हटलं आहे.देशात गेल्या १० वर्षापासून ईडी आणि सीबीआय हे नरेंद्र मोदी यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जे तिकडे गेले त्यांना माफी मिळणारच आहे. असे नाना पटोले म्हणाले.तिरोडा येथील जुनी नगर परिषद ग्राउंड वर गुरूवारी प्रचार सभा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत ते बोलत होते. पटोले म्हणाले की पुढील काही दिवसात त्यांना इकबाल मिरची प्रकरणातून पण क्लिनचिट मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हे समजण्यास पण आता हरकत नाही.
लोकांमध्ये मोदी सरकार विरोधात प्रचंड राग आहे. शेतकरी, तरुण, छोटा व्यापारी ,सर्व सामान्य जण यांच्या मनात राग आहे.त्यामुळे पुढील निवडणुकीत हे १५० पार जाणार नाहीत. यांना सत्तेतून जनताच बाहेरचा मार्ग दाखविणारा अशी टीका काँग्रेस पक्षातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या प्रसंगी गोंदिया भंडारा लोकसभा काँग्रेस उमेदवार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे,माजी मंत्री सतिश चतुर्वेदी,माजी खासदार खुशालचंद्र बोपचे,माजी आमदार दिलीप बनसोड,रविकांत बोपचे आदि उपस्थित होते.