बारामतीत रंगणार नणंद भावजय यांच्यात मुकाबला! सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळे दोघींचीही जोरदार तयारी

0
3

 पुणे-बारामतीवर गेल्या काही दशकापासून पवार यांची सत्ता राहिली आहे. पवार म्हणजे बारामती असे समीकरण आता पर्यंत होते. मात्र, अजित पवार यांनी बंड केल्यावर काका पुतण्या एकमेकांसमोर उभे आहेत. त्यामुळे आता बारामतीत लोकसभा मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. दोघीही मतदार संघ पिंजून काढत असून मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत कशी होणार हे आज अगदी स्पष्ट झाले आहे. शिवसेना-(एकनाथ शिंदे)-राष्ट्रवादी- (अजित पवार)- भाजप अशा महायुतीच्या ​​​बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आता पवार विरुद्ध सुळे अर्थात भावजय विरुद्ध नणंद अशी लढत पाहायला मिळणार आहे.

शनिवारी दुपारीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत परभणी लोकसभेची जागा घोषित केली. पण ही जागा राष्ट्रवादीने रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना जाहीर केली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत बारामती लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार देखील घोषित केला. या ठिकाणी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आले.

माझ्यासाठी आनंदाचा क्षण
महायुतीच्या वतीने मला राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी तिकिट मिळाले, हा क्षण माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. येणाऱ्या काळात माझा विजय नक्की होईल, लोकांचा देखील प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दादांच्या विचाराला साथ द्यावी, अशी विनंती लोकांकडून केलेली आहे. नक्कीच विजय होईल, असा विश्वास आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अजित दादांची चाल, विरोधकांचा साधला डाव

विजय शिवतारे यांच्या या घोषणेनंतर काहीवेळातच शरद पवार गटाकडून आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विजय शिवतारे आणि शरद पवार या दोघांनी आपले पत्ते उघड केल्यानंतर अजित पवार गटाकडून तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सुनील तटकरे यांनी बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली. हा सगळा घटनाक्रम पाहता अजित पवार यांनी बारामतीमधून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी विजय शिवतारे आणि शरद पवार हे दोघे काय करणार, याची वाट पाहिली. सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारातमीच्या उमेदवार असणार, ही काळ्या दगडावरची रेघ असतानाही अजित पवार यांनी शेवटपर्यंत संयम ठेवला. त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांनी आपापली चाल खेळल्याची खात्री झाल्यानंतरच अजित पवार यांनी आपला डाव टाकला आहे.

शिवतारेंची माघार, अन् उमेदवारी जाहीर
विजय शिवतारे यांनी शनिवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन बंडाची तलवार म्यान केली होती. त्यांनी आपण बारामतीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढाई होणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी फार पूर्वीपासूनच बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, या दोघींनाही आज पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे बारामती लोकसभेतील प्रचाराची रणधुमाळी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

बारामती मतदारसंघ 57 वर्षांपासून पवारांचा गड
बारामती लोकसभा मतदारसंघ हा 57 वर्षांपासून पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. 1967 मध्ये शरद पवार पहिल्यांदा बारामतीतून विधानसभा निवडणूक जिंकले. 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 मध्ये त्यांनी येथून सातत्याने विधानसभा निवडणुका जिंकल्या.

यानंतर शरद पवार बारामतीतून 1991, 1996, 1998 आणि 2004 मध्ये सलग खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी ही जागा 2009 मध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना दिली. सुप्रिया सुळे या 2009, 2014 आणि 2019 मध्ये येथून विजयी झाल्या होत्या. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

कोण आहेत सुनेत्रा पवार

60 वर्षीय सुनेत्रा पवार या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सुनेत्रा पवार 2010 मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक आहेत. सुनेत्रा पवार या विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त म्हणून काम करतात. 2011 मध्ये ती फ्रान्समधील जागतिक उद्योजकता मंच थिंक टँकच्या सदस्या होत्या. ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मंत्री पदमसिंग पाटील हे त्यांचे बंधू आहेत. त्यांचे पुतणे राणा जगजितसिंह पदमसिंह पाटील हे उस्मानाबादचे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा मोठा मुलगा पार्थने मावळमधून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र तो अयशस्वी झाला होता.

मुळशीत रिमझिम पावसात सभा
बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पिरंगुट, भुकुम भागात विविध सोसायट्यांना भेटी देत नागरीकांशी संवाद साधला. भुकुम येथील एका सोसायटीत संवाद कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्या भाषणावेळीच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पाऊसधारा म्हणजे आपल्यावर झालेली कृपा आहे, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी रिमझिम पावसातही उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोसायट्यांमधील विविध प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही दिली. त्याचवेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अजितदादांच्या विचारांचा खासदार निवडून द्यावा, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर दिंडोरी मधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अपेक्षेप्रमाणे शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कालच लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे नीलेश लंके यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.