‘स्थानिक स्वराज्य’मध्ये तरुणांना संधी देणार-शरद पवार

0
17

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये तरुणांना अधिकाधिक संधी राष्ट्रवादी काँग्रेस देणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले. या निवडणुकांमध्ये जवळपास ७० टक्के उमेदवार हे तिशीच्या आतील असावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, की तरुणांना संधी दिल्यास राष्ट्रवादी हा पक्ष तरुणांचा पक्ष आहे, असा संदेश सर्वत्र जाईल. त्यामुळे आतापासूनच नवे चेहरे शोधण्यास सुरुवात करा. तरुणांची नवी फळी उभी करा, त्यातून पक्षाला नक्कीच उभारी मिळेल, असे पवार यांनी सांगितले.

महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादीच्यावतीने सर्व जिल्ह्यांचे प्रभारी, राष्ट्रीय प्रतिनिधी, जिल्हा निरीक्षक, सर्व फ्रंटल प्रमुख व जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष यांची बैठक बुधवारी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. प्रफुल पटेल, अरुण गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. फौजिया खान व अन्य मान्यवर उपस्थित होते.