नारायण राणेंना तिकीट मिळताच शिंदे गटात राजीनामा सत्र सुरू…

0
7

तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघ अखेर भाजपने बळकावला

शिंदे गटाच्या हाती आले धुपाटणे

रत्नागिरी::-रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी आज जाहीर होताच शिंदे-शिवसेना गटात एकच खळबळ उडाली आहे. किरण उर्फ भैय्या सामंत यांना उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आता हे नाराज झालेले कार्यकर्ते महायुतीचे काम करतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच शिंदे-गटाचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या जागेवरुन महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला होता.शिंदे-शिवसेना गटाकडून किरण सामंत हे इच्छुक होते तर भाजपने या मतदार संघावर दावा करत नारायण राणे यांचे नाव पुढे आणले होते. मात्र रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा तिढा गेले अनेक दिवस सुटत नव्हता.

जानेवारी महिन्यापासूनच किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली होती. किरण सामंत यांच्या वाढदिवसालाच त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून जोरदार बॅनरबाजी केली होती. त्यानंतर रोकेगा कौन? असा प्रश्नही किरण सामंत यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून विचारला होता.

किरण सामंत यांना उमेदवारी मिळेल याची कार्यकर्त्यांना आशा होती. किरण सामंत यांचेही प्रयत्न सुरु होते. दुसरीकडे भाजपने महायुतीचे कार्यालय सुरु करत मेळावे घ्यायला सुरुवात केली आणि मतदार संघ बळकावला होता.भाजपने मतदार संघ बळकावल्यामुळे आता शिंदे-शिवसेना गटाच्या हाती धुपाटणे आले आहे. किरण सामंत यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.त्यातच शिंदे-शिवसेना गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई यांनी आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक कारणास्तव आपण युवासेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.