“अमरावतीत कोणतंही अघोरी कृत्य घडू शकतं”..

0
14

ईव्हीएम बंद पडल्यामुळे संजय राऊतांचा संशय…

..म्हणाले, “अचानक सायंकाळी..”

मुंबई:-राज्यात दुसऱ्या टप्प्यात आज आठ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत चुरशीच्या लढती होणार आहेत. प्रकाश आंबेडकर, नवनीत राणा, प्रतापराव जाधव, संजय जाधव, प्रतापराव चिखलीकर आदी उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. विदर्भातील पाचपैकी वर्धा, यवतमाळ-वाशीममध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असून अकोला, अमरावती आणि बुलढाणा या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. येथे तिसऱ्या उमेदवाराकडून होणारे मतविभाजन निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच वर्ध्यात इव्हीएम मशिन नादुरुस्त झाले आहे. यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. यावरून ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी टीका केली. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

*संजय राऊत म्हणाले,.

“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि आमच्या समोर चोरलेली शिवेसना असा सामना आहे. या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. आठ जागांवर भाजपाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फार संघर्ष करावा लागत आहे. मी आपल्याला वारंवार सांगतोय, प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुका जिंकतील. किंबहुना तेच जिंकतील असं वातावरण आहे. आम्ही ३५ प्लस टार्गेट हा आकडा ठेवला आहे, आम्ही तेवढ्या जागा जिंकू. या आठही जागांवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अमरावती आणि वर्ध्यातील इव्हीएमबाबत विचारले असता ते म्हणाले, अमरावतीत कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं. वर्ध्यात भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरे अमरावती आणि वर्ध्यात जाऊन आले. ईव्हीएम बंद पडणे आणि मतदारांना खोळंबायला लावणे आणि मग मतदारांनी मतदानाला पाठ फिरवणे हा षडयंत्राचा भाग आहे. अचानक संध्याकाळी मग मशिन चालू होतात ज्यांना हव्या त्यांच्या झुंडी उभ्या राहतात. पण सकाळी मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना नाउमेद करून त्यांना परत पाठवणे हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र आहे.

अमरावतीत तिरंगी लढत..

अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात तिरंगी लढत होत आहे. एकूण ३७ उमेदवार रिंगणात असून बहुसंख्य कुणबी-मराठा मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यावेळी भाजपच्या उमेदवार आहेत. काँग्रेसतर्फे बळवंत वानखेडे तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे दिनेश बुब रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, बच्चू कडू महायुतीत असूनही त्यांनी राणांविरुद्ध उमेदवार दिला असून राणांचा पराभव हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

वर्ध्यात थेट लढत..

वर्ध्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. भाजपातर्फे रामदास तडस तर महाविकास आघाडीतर्फे अमर काळे रिंगणात आहेत. तडस यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. अमर काळे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतरही नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. तेली विरुद्ध कुणबी अशी जातीय किनार या लढतीला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीकडे घेतला आहे.