विधानसभेसाठी महाराष्ट्र प्रभारीपदी भाजपच्या ‘या’ नेत्यांची नियुक्ती,प्रदेशाध्यक्ष बदलणार?

0
285
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई,दि.१७ः राज्यात लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आता भाजपने (BJP) विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.आज सोमवार (दि.१७) रोजी भाजपकडून महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) झालेल्या पराभवामुळे भाजपकडून मोठे संघटनात्मक बदल केले जातील याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर अखेर आज या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. तसेच राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष देखील बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपने महाराष्ट्र प्रभारीपदी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची तर सहप्रभारी पदी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी याबाबतची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर राज्यांचे प्रभारी देखील बदलण्यात आले आहे. यात हरियाणाच्या निवडणूक प्रभारीपदी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तर बिप्लब कुमार देब सहप्रभारी यांची सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय झारखंडच्या प्रभारी पदी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तर सहप्रभारीपदी हेमंत विश्व सरमा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांची जम्मू काश्मीरच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष देखील बदलले जाणार?

लोकसभा निवडणुकीत राज्यात दारुण पराभव झाल्यानंतर भाजप पक्षांतर्गत मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष देखील बदलले जाणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपचे २२ खासदार निवडून आले होते. मात्र, या निवडणुकीत ही संख्या ९ वर आली असून भाजपचा राज्यात तब्बल १३ जागांवर पराभव झाला आहे.त्यामुळे पक्षासाठी हा मोठा सेटबॅक असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या कामगिरीचे मुल्यमापन नवनियुक्त प्रभारी आणि सहप्रभारी करणार आहेत. त्यानंतर गरज पडल्यास संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबईला नवीन भाजप अध्यक्ष मिळू शकतो.