मुंबई: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ओबीसीचे समन्वयक ईश्वर बाळबुद्धे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. बाळबुध्दे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित आहेत. बाळबुध्दे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही दिवसांपूर्वीच राम-राम केला होता. आज त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
पक्षप्रवेशानंतर काय म्हणाले ईश्वर बाळबुध्दे?
यावेळी बोलताना ईश्वर बाळबुध्दे म्हणाले, ‘मी छगन भुजबळ साहेबांबरोबर गेली ३० वर्ष काम करतोय. पण मंडल आयोगाची आणि ओबीसी घटकाला खरा न्याय दिला ते शरद पवार आहेत आणि आता जर या वर्गाला ओबीसी घटकाला न्याय देण्यासाठी उभे करण्यासाठी कोणी प्रयत्न करतेय ते जयंत पाटील साहेब आहेत. आज थोडे वाईट वाटते की, ३० वर्ष छगन भुजबळ साहेबांसोबत होतो. मी आज त्यांना सांगितले त्यांना हात जोडून आलो की युती ओबीसीला न्याय देऊ शकत नाही, असंही त्यांना सांगितलं असल्याचं बाळबुध्देंनी सांगितलं आहे.
ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक व प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी आज पुन्हा(शुक्रवारी) शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विदर्भातील ओबीसी नेते ईश्वर बाळबुध्दे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एकसंघ असताना ईश्वर बाळबुध्दे तब्बल सहा वर्ष पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. अजित दादांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ईश्वर बाळबुध्दे अजितदादांसोबत गेले होते. अजितदादांकडे असताना ईश्वर बाळबुध्दे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचा प्रदेश संयोजक पद होते. ईश्वर बाळबुध्दे मुळात छगन भुजबळ यांचे खास कार्यकर्ते असून भुजबळांसोबत ते गेले दोन दशक समता परिषदेत सक्रिय आहेत.