अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मूर्तिजापूर मतदारसंघात उमेदवार जाहीर करताच पक्षात फूट पडली. उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते बंडखोरीच्या तयारीत आहे. दरम्यान, आपण त्यांची समजून काढू, असे राष्ट्रवादीचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी सांगितले.
मूर्तिजापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीने सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिल्यावरून पक्षात नाराजीनाट्य सुरू झाले. डोंगरदिवे यांची उमेदवारी जाहीर होताच गेल्या वेळेस राष्ट्रवादीकडून लढणारे तथा प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला. काही महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली जात असेल तर आम्ही पाच वर्ष काम करण्यात काही अर्थ नाही, असा रोष व्यक्त करीत रवी राठी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. अपक्ष किंवा इतर कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढायची का? या दृष्टीने ते चाचपणी करीत आहेत.
मूर्तिजापूरमध्ये २०१९ मध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीचे रवी राठी यांना तिसऱ्या क्रमांकाची ४१ हजार १५५ मते मिळाली होती. यावेळेस देखील महाविकास आघाडीत मूर्तिजापूर मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी सम्राट डोंगरदिवे व रवी राठी इच्छुक होते. दोघांनीही गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली होती. उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना गुरुवारी पक्षाच्या पहिल्या यादीतच उमेदवारीची माळ डोंगरदिवे यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे रवी राठी यांनी नाराज होऊन राजीनामा दिला आहे. त्याचा मोठा फटका निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत आहे.
इतर पक्षांच्या संपर्कात
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मूर्तिजापूरमधून तिकीट न मिळाल्याने रवी राठी इतर पक्षांच्या संपर्कात आहेत. भाजपने विद्यमान आमदाराला अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे रवी राठी भाजपच्या देखील संपर्कात असल्याची जोरदार चर्चा असून त्याला त्यांनी दुजोराही दिला.