23.1 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home राजकीय माजी मंत्र्यांसह तब्बल सहा जणांची काँग्रेसमधून सहा वर्षाकरीता हकालपट्टी

माजी मंत्र्यांसह तब्बल सहा जणांची काँग्रेसमधून सहा वर्षाकरीता हकालपट्टी

0
948

नागपूर: महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही रामटेक, कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांना काँग्रेसकडून नोटीस बजाविण्यात आली होती. बंडाची तलवार म्यान करून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा. तसे न केल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. त्यानंतरही अर्ज माघार न घेतलेल्या आणि बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल, सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या जयश्री पाटील आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

प्रियंका गांधी तीन दिवस महाराष्ट्रात

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच गॅरंटी आम्ही काल जाहीर केल्या आहेत. भारताचे भविष्य उज्वल करण्यासाठी या गॅरंटी महत्त्वाच्या आहेत. १३, १६ आणि १७ नोव्हेंबरला प्रियंका गांधी महाराष्ट्रात येत आहेत. मल्लिकार्जुन खरगे पाच दिवस महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. ज्या कांग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे त्यांना ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.