सिंधुदूर्ग ::-सिधुदुर्गात नारायण राणे यांनी शिवसेनेचा झंझावात निर्माण केला. २००४ ची राणे यांनी शिवसेनेतून लढविलेली शेवटची निवडणूक ठरली.सिंधुदुर्गात २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकला.यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लढत अधिक लक्षवेधी ठरली. सलग दुसऱ्यांदा मतविभागणीचा फायदा होऊन शिवसेनेचे शिवराम दळवी विजयी झाले. भाजपचे अॅड. अजित गोगटे हे आप्पांच्या पुण्याईवर निवडून आले.
सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी शिवसेनेचा झंझावात निर्माण केला. २००४ ची राणे यांनी शिवसेनेतून लढविलेली शेवटची निवडणूक ठरली; मात्र निवडणुकीवेळी नारायण राणे आणखी वर्षभरात काँग्रेसमध्ये जाणार आहेत, असे कोणालाही स्वप्नातही वाटले नव्हते. राणेंनीही पूर्ण ताकदीने जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागा युतीच्या पारड्यात टाकल्या. सावंतवाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली होती.
यापूर्वीच्या (१९९९) निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने सावंतवाडीतून शिवसेनेचे शिवराम दळवी अगदी घासून विजयी झाले होते. २००४ च्या निवडणुकीतही ते नशिबवान ठरले. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा प्रवीण भोसलेंना उमेदवारी मिळाली. यावेळी इच्छुक असलेले दोडामार्गमधील नेते सुरेश दळवी यांनी बंडखोरी केली. यात भोसले यांना ३४८६८ मते मिळाली. दळवींनी तब्बल २६७८२ मते मिळविली. शिवसेनेच्या शिवराम दळवींनी ३९१५२ मते घेत विजय मिळविला. यावेळी बहुजन समाज पार्टीच्या अॅड. अनिल दळवींना ३२३२, अपक्ष सुनील गावडे यांना २२१६ मते मिळाली.
वेंगुर्लेत पुन्हा एकदा विजय मिळवत शिवसेनेच्या शंकर कांबळी यांनी हॅट्ट्रिक साधली. तेथे काँग्रेसच्या पुष्पसेन सावंत (३१५३२), बहुजन समाज पार्टीच्या संतोष परब (१२३३), जनता दलाच्या कमलताई परुळेकर (२१७६), समाजवादी पार्टीच्या विजयकुमार वारंग (४४३), अपक्ष सोमनाथ टोमके (११४५), नीता राणे (२८६९) यांचा पराभव करून श्री. कांबळी (४९४७४) विजयी झाले. मालवणमध्ये पुन्हा एकदा एकतर्फी निवडणूक झाली. शिवसेनेच्या नारायण राणेंनी ६३,७८४ मते घेऊन मोठा विजय मिळविला. तेथे काँग्रेसच्या विजय सावंतांना २९,६३९, बहुजन समाज पार्टीच्या शरद भोवर यांना १६१२, अपक्ष नंदकुमार सावंत यांना १७६९ मते मिळाली.
देवगडमध्ये आप्पासाहेब गोगटे यांनी आपण यावेळची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. भाजपने त्यांचे पुतणे अॅड. अजित गोगटे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या कुलदीप पेडणेकर यांनी त्यांना चांगली लढत दिली. तेथे गोगटेंना ४२३८४ तर पेडणेकर यांना ४१३१२ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे सुधाकर माणगावकर (६३३), अपक्ष दौलत जोशी (२६२), महेश जुवाटकर (३९७), महेंद्र नाटेकर (९७७), सुनील सरवणकर (१८२४) हे उमेदवार त्यावेळी रिंगणात होते.